आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rice Seed Goes To Waste Due To No Rain In Nashik District

बळीराजा चिंतातुर : मृगाची सर हुकली... भाताची रोपे सुकली!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इगतपुरी - इगतपुरी तालुक्यात तीन महत्त्वाची नक्षत्रे उलटूनही पावसाचे आगमन न झाल्याने लागवडीसाठी पेरणी केलेली भाताची रोपे पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर असल्याने बळीराजा चिंतातुर झाला आहे. भाताच्या लागवडीसाठी योग्य पाऊस केव्हा होणार, याची शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत. पाऊस लांबणीवर पडल्याने तालुक्यात पाणीटंचाईची समस्या वाढली असून, पिण्याच्या पाण्याचे स्रोत असणा-या विहिरी, नद्या व नाले आटल्याने कोरडेठाक पडले आहेत. सर्व प्रमुख धरणांनी तळ गाठला असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

इगतपुरी तालुक्यात सुरुवातीच्या काळात झालेल्या वादळी पावसाच्या पाण्यावर शेतक-यांनी भाताच्या पेरण्या केल्या होत्या. काही दिवसातच पेरलेले धान्य कोम धरून वर आले. परंतु, त्यानंतर पावसाने सर्वत्र पाठ फिरविली. हळूहळू पाण्याअभावी या रोपांची वाढ खुंटली आणि उन्हाच्या तडाख्याने ही पिके करपू लागली. काही शेतक-यांनी मात्र ही रोपे वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करीत जवळील धरण, नदी, नाले व विहिरी यांतील पाणी भरले. पण, कालांतराने पाण्याचे हे स्रोतही आटू लागले. यावरही मात करीत काही शेतक-यांनी टॅँकरने पाणी टाकून ही रोपे वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचे दिसून येते. गतवर्षी 15 जूनपर्यंत सर्वच
शेतक-यांची भात लावणी पूर्ण झाली होती. यावर्षी जून महिना उलटून गेला तरी पावसाने हजेरी न लावल्याने शेतक-यांचे डोळे पाणावले आहेत. तालुक्यातील विहिरी, धरणे, नद्या यांनीदेखील तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करूनही पिण्यासाठी पाणी मिळत नाही.

धरणांत उरला केवळ मृत साठा
इगतपुरी तालुक्यातील दारणा, कडवा, वैतरणा, भावली, मुकणे ही सर्व धरणे मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने तुडुंब भरली होती. या धरणातील पाण्याचा वापर शेतीसाठी आणि सिंचनासाठी केल्याने ही सर्व धरणे आजमितीला कोरडीठाक पडली आहेत. यातील भावली धरणात केवळ चार दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे, तर दारणा धरणात 378
द.ल.घ.फू. इतका पाणीसाठा शिल्लक आहे. यातील काही साठा चेहडी बंधारा व एम. एल. बंधा-यात केवळ पिण्यासाठी सोडण्यात आला आहे. तर, मुकणे व कडवात मृत साठा आहे.

पिण्याच्या पाण्याची विवंचना
पावसाने दडी मारल्याने पाणीटंचाईने गंभीर रूप धारण केले आहे. तसेच अनेक गावांतील विहिरींनी तळ गाठला आहे. अनेक गावांतील महिला पाणी कुठून मिळवावे, या विवंचनेत आहेत. याबाबत ग्रामसेवकाकडे कैफियत मांडल्यानंतर ग्रामसेवकही याकडे काणाडोळा करीत आहेत.