आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

DM EXCLUSIVE: श्रीमंत रुग्णांच्या हाती गरिबांचे ‘हेल्थ कार्ड’, रुग्‍णालयांकडूनच वाटली जातेय खिरापत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सर्वसामान्यांसाठी असणाऱ्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना अर्थात पूर्वीच्या राजीव गांधी जीवनदायी अाराेग्य योजनेलाच गैरकारभाराचा रोग जडला आहे. शासनाकडून ही योजना गोरगरिबांच्या माेफत उपचारासाठी सुरू करण्यात अाली असली तरी, प्रत्यक्षात श्रीमंत रुग्णदेखील या योजनेचे लाभार्थी असल्याची धक्कादायक माहिती डी. बी. स्टारच्या हाती लागली आहे. विशेष म्हणजे रुग्णालय प्रशासनाकडूनच श्रीमंत व्यक्तींना आरोग्य कार्डची खिरापत वाटली जात असल्याचे समोर आले आहे. एवढ्यावर न थांबता योजनेंतर्गत रुग्णांना दीड लाखापर्यंत मोफत औषधोपचार तपासण्यांचा अंतर्भाव असताना, काही रुग्णालये मात्र रुग्णांकडून चाचण्यांसाठी पैसे घेत असल्याच्याही तक्रारी डी. बी. स्टारकडे प्राप्त झाल्या आहेत. आरोग्य व्यवस्थेच्या या अनागोंदी कारभारावर हा प्रकाशझोत.....

 

महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना अर्थात राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत वार्षिक एक लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबीयांना ९७१ आजारांवर उपचार शस्त्रक्रिया मोफत करण्याचा लाभ दिला जातो. आर्थिक दुर्बल घटकांना पैशांअभावी दर्जेदार उपचारांपासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये या उद्देशाने ही जीवनदायी योजना सुरू करण्यात आली. त्यात मुतखडा, किडनी स्टोन, मेंदू शस्त्रक्रिया, मणक्याचे आजार, कॅन्सर अशा शेकडो आजारांचा समावेश आहे. या योजनेंतर्गत रुग्णांना दीड लाख रुपयांपर्यंतची आैषधे, उपचार तपासण्या माेफत करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. त्यामुळेच आता श्रीमंतांकडूनही या योजनेचा गैरफायदा घेतला जात आहे. शहरातील काही रुग्णालयेच श्रीमंतांना बोगस हेल्थ कार्ड तयार करून देत आहेत. तर, दुसरीकडे काही रुग्णालये या योजनेंतर्गत पात्र गरीब रुग्णांची उपचारांसाठी अडवणूक करत असल्याच्या तक्रारी अाहेत. योजनेंतर्गत उपचारानुसार रुग्णाला दीड लाख रुपयांपर्यंत मोफत आैषधोपचार तपासण्या करून देण्याच्या सूचना असताना काही रुग्णालये रुग्णांकडून अनेक तपासण्यांसाठीही पैसे घेत असल्याच्या तक्रारी ‘डी. बी. स्टार’कडे आल्या आहेत.

 

उपचारासाठी केली जाते टाळाटाळ
जिल्ह्यातील तीन शासकीय रुग्णालयांसह २७ खासगी रुग्णालयांना अाराेग्य योजनेंतर्गत उपचार शस्त्रक्रियेसाठी परवानगी मिळालेली आहे. या रुग्णालयांमध्ये मल्टिस्पेशालिटी, दहापेक्षा अधिक बेड असलेले स्पेशालिटी, ऑर्थोपेडिक्स, लहान मुलांचे, कान-नाक-डोळे-घसा इ. दवाखान्यांचा समावेश आहे. संबंधित रुग्णालय व्यवस्थापनांना उपचार शस्त्रक्रियेचा सर्व खर्च राज्य सरकारतर्फे देण्यात येताे. मात्र, काही रुग्णालयांकडून योजनेंतर्गत उपचार, शस्त्रक्रियेस टाळाटाळ केली जात असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत अाहेत.

 

खऱ्या लाभार्थ्यांना मात्र वेगळाच न्याय
काही रुग्णालयांकडून जीवनदायी योजनेंतर्गत लाभार्थ्यांना वेगळी वागणूक, तर श्रीमंत रुग्णांना वेगळा न्याय दिला जात असल्याचे चित्र आहे. मुंबईनाका भागातील एका रुग्णालयात लाभार्थ्यांवर दुपारनंतर उपचार केले जातात, तर सकाळी श्रीमंत रुग्णांना प्राधान्य दिले जाते. नेहमीच्या रुग्णांवरील उपचार होत नाहीत, तोपर्यंत लाभार्थ्याकडे ढुंकूनही पाहिले जात नसल्याचे वास्तव आहे.


शासकीय रुग्णालयात घेतले जातात पैसे
अाराेग्य योजनेंतर्गत मंजूर उपचारानुसार रुग्णाला दीड लाखापर्यंत मोफत आैषधोपचार आणि तपासण्यादेखील करून देण्याच्या सूचना अाहेत. मात्र, शासनाच्याच विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात या योजनेंतर्गत उपचारासाठी रुग्णांकडून तपासण्यांचे शुल्क वसूल केले जात असल्याच्या तक्रारी आहेत.


योजनेंतर्गत या रोगांवर केले जातात उपचार
लाभार्थ्यांना शस्त्रक्रिया, नेत्र, अस्थिव्यंग, हृदय, किडनी, मेंदू, जठर, बालरोग, मूत्रपिंड, कर्करोग, मेंदू, मज्जासंस्था, मणका, भाजणे, प्लास्टिक सर्जरी, अपघातातील फ्रॅक्चर, अतिदक्षता विभागातील उपचार, नवजात शिशूंचे उपचार, कृत्रिम अवयव, आकस्मिक वैद्यकीय उपचार, त्वचा, सांधे फुप्फुसासंदर्भातील आकस्मिक उपचार, एंडोक्राइन इंटरव्हेन्शन रेडिऑलॉजी या उपचारांचा लाभ मिळतो. शिवाय, उपचारादरम्यान निदान झाल्यावर लागणारी अाैषधे, शस्त्रक्रिया, उपचार, भोजन, एकेरी प्रवास खर्चाचाही योजनेत समावेश आहे.

 

उपचार खासगीत अन् तपासण्या ‘सिव्हिल’ला
शहरातील काही नामवंत खासगी रुग्णालयांत रुग्ण गेल्यास आधी आरोग्य योजनेंतर्गत उपचारास नकार दिला जाताे. उपचाराचा आग्रह धरलाच तर रुग्णांची फाइल मंजूर करून त्यांना शासकीय रुग्णालयात तपासण्यासाठी पाठविले जाते. अनेक रुग्णालयांमध्ये तर या तपासण्या अामच्या रुग्णालयात होणारच नाहीत, असे सांगून रुग्णांची बोळवण केली जाते. त्यामुळे रुग्णांना संबंधित तपासण्यांवर पैसे खर्च केल्यानंतरच उपचारासाठी या रुग्णालयात दाखल करून घेतले जात असल्याचाही प्रकार समोर आला अाहे.

 

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, ५० हजारांची सर्जरी २० हजार रुपयांत...

 

 

 

 

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...