आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्षाचालकाच्या रूपाने वयोवृद्धास भेटला देवदूत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सोमवारची सकाळ. इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकवर झपझप चालणारी पावले थबकतात. थकलेला चेहरा, फाटलेला सदरा अन् फुटलेले नशीब अशा अवस्थेतील एक र्जजर वृद्ध शून्य नजरेने लोकांकडे पाहात असतो. काही क्षणातच माणुसकीला पाझर फुटतो अन् बाबांना पोलिस ठाण्यात पोहचवले जाते. पण, नेहमीचा निर्दयीपणा एकदा नव्हे तर दोनदा दाखवत पोलिस त्यांना वार्‍यावर सोडून देतात. मग ‘बाबां’च्या शुर्शूषेसाठी पुढे सरसावतो एक सामान्य रिक्षाचालक. काही नागरिक त्याला साथ देत बाबांच्या मुलाचा शोध घेतात.
आता हा डॉक्टर मुलगा आपल्या हरवलेल्या पित्याला घेऊन जाण्यासाठी नाशिककडे निघालाय!
अंगावरील जिल्हा रुग्णालयाच्या कपड्यांमुळे त्यांच्यावर तेथेच उपचार सुरू असल्याचे स्पष्ट होते. काही सहृदयी नागरिक त्यांना चहा देतात. काही वेळातच सर्जेराव चव्हाण हा रिक्षाचालक येतो आणि बाबांना डबा देतो. मग बाबांना इंदिरानगर पोलिस ठाण्यात पोहचविले जाते. पोलिस जिल्हा रुग्णालयात सुखरूप पोहचवतील, हा यामागचा हेतू; पण बाबांना पुन्हा बेवारस अवस्थेत रस्त्यावर सोडले जाते.
दुपारी पुन्हा त्याच नागरिकांना बाबा जॉगिंग ट्रॅकवर दिसतात. रिक्षाचालकाला हे कळताच तो नारळपाणी घेऊन पोहोचतो. या प्रकाराने चिडलेले नागरिक पोलिसांशी संपर्क साधतात. पोलिसांचे वाहन पोहचते. त्यात बाबांना बसवले जाते. एक नागरिक पोलिसांना विनंती करतो, ‘बाबांना सुखरूप सिव्हिलपर्यंत न्या.’ पण नागरिकांची पाठ वळताच पोलिस बाबांना गाडीतून उतरवून देतात. रिक्षावाला अस्वस्थ होत तो सिव्हिलमध्ये जाऊन बाबांचा तपास करतो; पण ते सापडत नाहीत.
शोधाअंती रात्री अकराच्या सुमारास त्याला इंदिरानगर पोलिस ठाण्याशेजारील कठड्यांवर बाबा कुडकुडत पहुडलेले दिसतात. रिक्षावाला बाबांना दूध-पोळी भरवत रात्रभर जोडीला थांबतो. गप्पांमध्ये त्याला कळते की, बाबा मध्य प्रदेशातील होशंगाबादचे रहिवासी. मुलगा एका हॉस्पिटलमध्ये डॉक्टर. परिसरातील रहिवासी जयदीप राका होशंगाबाद येथील आपल्या नातेवाइकाला फोन करून हॉस्पिटल व बाबांच्या मुलाचा मोबाइल क्रमांक मिळवतात. मुलाला नाशिककरांचे आभार कसे मानावेत तेच कळत नाही.