आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘रिमझिम रिमझिम’ : कुसुमाग्रजांच्या संकल्पनेवर नवं नाटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांनी 55 वर्षांपूर्वी म्हणजेच 1959च्या दरम्यान अलंकारिक संवाद शैलीतून ‘प्रकाशाची दारे’ ही लघुनाटिका लिहिली होती. ती त्याकाळी दिवाळी अंकात प्रसिद्धही झाली होती. या नाटिकेचीच संकल्पना घेऊन लेखक दत्ता पाटील यांनी ‘रिमझिम रिमझिम’ हे नाटक लिहिलं आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि ‘दि जिनिअस’ संस्थेने या नाटकाची निर्मिती केली आहे. 28 जुलैला हे नाटक रंगमंचावर येत असून, यात अभिनेता चिन्मय उद्गीरकर आणि अभिनेत्री मृणाल दुसानीस यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
संकल्पना जुनी, लेखन नवे
‘रिमझिम रिमझिम’ या नाटकाची कथा जुनी असली तरी लेखन नवे आहे. आजच्या स्थितीशी सुसंगत आहे. यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह लोकेश शेवडे यांचे खूप सहकार्य लाभले. या नाटकाची रचना करतानाचा संदर्भ, संवाद, शैली यातील पात्रांचे स्वभाव हे आजच्या काळाशी जुळविण्याचा प्रयत्न केला आहे.
दत्ता पाटील, दिग्दर्शक
भावनांचा ठाव घेणारं नाटक
४आजच्या तरुण पिढीच्या मनातील भावनांचा ठाव घेणारं हे नाटक आहे. यानिमित्ताने महान कवी आणि नाटककार वि. वा. शिरवाडकरांची संकल्पना असलेलं नवं नाटक करायला मिळतंय, याचंच आम्हाला अप्रुप आहे. मुळातच छोटा जीव असलेल्या मूळ संकल्पनेवर दोन अंकी नाटक करणं हे खरंतर आव्हान होतं.
प्रवीण काळोखे, दिग्दर्शक
अशी आहे थीम
नवदांपत्याच्या घरात अचानक शिरणार्‍या वावटळीनं काय होऊ शकतं व त्या वादळाचा कोणाकोणाला तडाखा बसतो याचं चित्रण या कथेत केलं आहे. या कथेची मध्यवर्ती संकल्पना घेऊन नव्या संदर्भांची गुंफण या नाटकात करण्यात आली आहे. यामुळे रसिकांना एक वेगळे नाटक पाहायला मिळणार आहे.
या नाटकाबद्दल प्रचंड उत्सुक
४मी रिमझिम-रिमझिम नाटकात काम करण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे. मोठ्या अंतरानंतर मी पुन्हा नाटकात काम करतोय. या नाटकातील भूमिका फार आवडली आणि शिवाय दिग्दर्शक प्रवीण काळोखे आणि लेखक दत्ता पाटील या जोडीबरोबर काम करण्याची संधीही यामुळे मिळाली. हे नाटक रसिकांना नक्कीच आवडेल.
चिन्मय उद्गीरकर, अभिनेता
आव्हानात्मक भूमिका
४या नाटकातील भूमिका खूप आव्हानात्मक वाटली. नाटक हे खरंतर माझ्यासाठी सरप्राइज आहे. नाटक करताना कलाकाराचा कस लागतो. अर्थात दिग्दर्शक, लेखक, संस्था आणि सहकलावंत हे आधीपासूनच माझ्यासाठी कुटुंबासारखे असल्याने या नाटकाबद्दल मला कसलेही दडपण वाटले नाही.
मृणाल दुसानीस, अभिनेत्री