आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खड्डे बुजविण्यासाठी धावाधाव; भरपावसात अधिका-यांसमोर बिनदिक्कतपणे काम सुरूच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अधिका-यांचा सुसज्ज ताफा, सोबत स्थानिक नगरसेवक, मुरूम व विटा मातीने भरलेले डंपर घेऊन पावसाच्या सरी झेलत व चिखलातून वाट काढत स्थायी समिती सभापती अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी पंचवटी व नाशिक पूर्व विभागीय कार्यालयाच्या हद्दीतील खड्ड्यांची पाहणी केली. ‘दिव्य मराठी’ने सुरू केलेल्या खड्डारत्न पुरस्काराच्या पार्श्वभूमीवर जागेवर उभे राहून ‘दिसला खड्डा की, टाक मुरूम’ असे आदेशच ढिकले यांनी दिले. प्रशासनाची खड्डे बुजविण्यासाठी मोठीच धावपळ उडालेली दिसली.

कोट्यवधी रुपयांच्या रस्त्याची कामे खड्ड्यात गेल्याने ‘दिव्य मराठी’तर्फे विशेष अभियानांतर्गत व्हॉट्सअ‍ॅपवर नागरिकांनी खड्ड्यांचाच पाऊस पाडला. नाशिककरांनी सत्ताधा-यांबरोबरच बेजबाबदार प्रशासनावर टीकेचे ताशेरे ओढले. याबाबत सोमवारी ‘दिव्य मराठी’ने सचित्र वृत्त दिल्यानंतर सभापती ढिकले यांनी सकाळी 10 वाजताच नियोजन करून मुख्य रस्त्यांवर पाहणी केली. त्यांच्यासमवेत नगरसेवक यशवंत निकुळे, गणेश चव्हाण, सुरेखा भोसले आदी होते. मालेगाव स्टॅण्ड येथून पाहणी दौ-याला सुरुवात झाली.
येथील हनुमान मंदिरासमोरील भलामोठा खड्डा माझ्या डोळ्यासमोरच बुजवा, अशी सूचना त्यांनी केल्यानंतर तत्काळ विभागीय अधिका-यांनी ट्रॅक्टरमधील माती व मुरूमाने खड्डे भरण्यास सुरुवात केली. त्यानंतर मखमलाबाद नाकामार्ग प्रथम पेठरोडची पाहणी केली. नवीन बाजार समिती व पेठरोडवरील फुलेनगर, तेलंगवाडी, जुनी बाजार समिती रस्त्यावरील खड्डे भरण्याचे आदेश दिले. त्यानंतर ढिकले यांनी तारवालानगर चौफुलीजवळील नवीन रिंगरोडला पडलेले खड्डेही बुजविण्याचे आदेश दिले. आर.टी.ओ. कॉर्नर येथील महत्त्वाच्या रिंगरोडला जोडणा-या चौकांची खड्ड्यांनी चाळणी झाल्याचे लक्षात आले. म्हसरूळकडे जाणा-या पेट्रोलपंपापर्यंत पाहणी केल्यावर परतीच्या मार्गावर त्यांनी पंचवटी पोलिस ठाणे, बाजार समितीच्या मुख्य द्वारावर पाहणी केली.
येथील म्हसोबा मंदिरापर्यंतचा रस्ता उखडल्याचे लक्षात आले. त्यानंतर अशोकस्तंभाकडून रविवार कारंजाला जाणा-या रस्त्यालगतचे खड्डे बुजविण्यात आले. तेथून सी.बी.एस. मार्ग ते मुंबई नाक्याकडे आले. हॉटेल संदीपसमोरील दुभाजक सुशोभीकरणाच्या कामामुळे झालेले खड्डे भरण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
स्टंट नको; रिझल्ट हवा
मी दौरा केला म्हणून तुम्ही खड्डे बुजवाल; मात्र परत पावसामुळे खड्डा उखडला तर तोही बुजवा. स्टंटबाजी म्हणून दौरा करीत नाही, मात्र रिझल्ट हवा. परत पाहणी केल्यावर खड्डे उघडे दिसले तर तुमच्यावर कारवाई केली जाईल, असे बोलही त्यांनी सुनावले. पावसाळा संपेपर्यंत फक्त खड्डे भरण्यावर लक्ष द्या, अशा सूचनाही त्यांनी केल्या.