आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ते सुधारा, अन्यथा कारवाई; पालकमंत्री महाजन यांची ठेकेदारांना तंबी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - तपोवन परिसरातील साधुग्रामच्या अंतर्गत रस्त्यांवर अगदी जाड खडी वापरण्यात आल्याने संतापलेले पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी ठेकेदारांना ताबडतोब येथील खडी बारीक करण्याचे अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. अन्यथा, कारवाई केली जाईल, अशी तंबीदेखील त्यांनी या वेळी दिली.

अवघ्या ३३ दिवसांवर येऊन ठेपलेल्या सिंहस्थाच्या कामांची विशेषत: पहिल्या पावसात धूळधाण झालेल्या साधुग्रामची पालकमंत्री महाजन यांनी गुरुवारी पाहणी केली. पहिल्याच पावसात उडालेले पत्रे, पडलेले शेड या केवळ सुरू असलेल्या किंवा अर्धवट स्थितीत असलेल्या कामांचेच नुकसान झालेले असून, तेथे त्वरित डागडुजी करून, दर्जा वाढवून सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या.

दरम्यान, पालकमंत्र्यांचा गुरुवारचा साधुग्रामच्या पाहणीचा दौरा निश्चित नव्हता. केवळ त्र्यंबकेश्वरच्या कामांचीच पाहणी करण्याचे नियोजन होते. परंतु, पहिल्याच पावसाने नुकसान झालेल्या साधुग्रामची पाहणी एकाही मंत्र्याने केली नसल्याचा प्रश्न उपस्थित झाल्याने पालकमंत्र्यांनी ऐनवेळी तेथे पाहणी करण्याचा निर्णय घेतला. या वेळी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, मेळा अधिकारी महेश पाटील यांच्यासह महापालिका आणि इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

चर आणखी खोल करणार
साधुग्रामध्ये उभारलेल्या पत्र्यांच्या कुट्यांमध्येच पाणी वाहून जाण्यासाठी चर खोदण्यात आले आहेत. परंतु, तेवढेच पुरेसे नसल्याने ते अधिक खोल कऱण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी या वेळी दिल्या. त्याची तातडीने अंमलबजावणी करणार असल्याचे प्रशासन आणि ठेकेदाराच्या वतीने आश्वासित कऱण्यात आले.
कामे वेळेतच पूर्ण होण्याचा विश्वास
सिंहस्थाची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. शिवाय जी अपूर्ण आहेत ती नव्याने देण्यात आलेल्या ‘डेडलाईन’मध्येच पूर्ण होतील, असा विश्वास पालकमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला. दरम्यान, नाशिकमधील कामांबाबत समाधानकारक स्थिती असली,तरी त्र्यंबकची कामे संथगतीने सुरू असल्याबद्दल पालकमंत्री महाजन यांनी नाराजी व्यक्त केली. ही कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी त्र्यंबकेश्वरमध्ये तळ ठोकून आहेत. त्यामुळे ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न सर्वतोपरी करीत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
साधुग्राममधील पाहणीदरम्यान गुरुवारी रस्त्याच्या दुरुस्तीबाबत सूचना करताना पालकमंत्री गिरीश महाजन. समवेत जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह आदी.