आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द्वारका चौकातील कोंडी फुटणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिली तत्त्वत: मान्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरासाठी भूषणावह ठरणाऱ्या उड्डाणपुलाला ठिकठिकाणी अंडरपास, चढण्या-उतरण्यासाठीचे आवश्यक रॅम्प टाकल्याने निर्माण होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे. त्यांच्या उपस्थितीत दिल्लीत आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे द्वारका चौकातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सुटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाचे सर्वत्र स्वागत होत होते. मात्र, या पुलाला आवश्यक असणारे अंडरपास, वाहने चढण्या-उतरण्यासाठीचे रॅम्प, सबवेचे योग्य नियोजन झाल्याने हा मार्ग वाहनधारकांसाठी अडचणीचा ठरत आहे. यामध्ये द्वारका चौकात दररोज तासन््तास वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असून, त्याचा परिणाम मुंबई पुणे मार्गाकडे जाणाऱ्या वाहतुकीवर होत आहे. यावरील तोडग्यासाठी आमदार फरांदे यांनी गडकरी यांच्याकडे बैठक आयोजित केली होती.

या बैठकीत फरांदे यांनी शहरातील वास्तुविशारदांनी तयार केलेले आराखडे सादर केले. त्यानुसार कमोदनगर, लेखानगर, रासबिहारी स्कूल के. के. वाघ महाविद्यालयाजवळ असे एकूण चार अंडरपास काढण्याच्या मागणीला मंजुरी देण्यात आली. द्वारका सर्कल असो की, अंडरपासचे चुकीचे नियोजन लक्षात आणून दिल्यावर गडकरी यांनी सल्लागार कंपनीस जबाबदार धरून त्यांना ब्लॅक लिस्ट करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्‍या. या वेळी महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, महामार्ग विभागाचे सचिव सिंग, कार्यकारी अभियंता खोडसकर, वाहतूक निरीक्षक एम. एम. बागवान आदी उपस्थित होते. वास्तुविशारद विवेक जायखेडकर, विजय अग्रवाल कुटे यांच्या मदतीने प्रस्तावित आराखडा सादर केला.

द्वारका चौकातील कोंडी फोडण्यासाठी हनुमान मंदिर स्थलांतरित करून ते मागे महापालिकेच्या जागेत स्थलांतर करावे लागणार आहे, तसेच चौकातील चारही बाजूंच्या समांतर रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येईल. रस्ता सात मीटरवरून नऊ मीटर करणे, द्वारकेवरील रॅम्पजवळील वाहतूक बेट त्वरित हटविणे, चारही बाजूस उभारण्यात आलेल्या सब-वेचे प्रवेशद्वार हटवून ते किमान चौकांपासून १०० फुटांवर करणे अथवा ते कायमस्वरूपी हटवून त्या ठिकाणी रोलिंग टाकणे, रस्त्यांना जोडण्यासाठी कर्व्ह करणे आदी उपायांबरोबरच मंदिराच्या मागील बाजूने समांतर रस्ता काढून तो थेट जिल्‍हा बँकेच्या समोरील महामार्गाला जोडता येणार आहे. त्यामुळे अवजड वाहने चौकात येणार नाहीत. चौकातील चारही बाजूंचे रिक्षा, जीप, खासगी बसथांबे हटवावे लागणार आहेत. या ठिकाणी टाकण्यात आलेले रोलिंग, फ्लाॅवर बेड त्वरित काढून त्या ठिकाणी डांबरीकरण केल्यास जागा मोळकी होईल. या प्रस्तावित आराखड्याच्या अंमलबजावणीचे आदेशही देण्यात आले आहेत.

नवी दिल्ली येथे गुरुवारी द्वारका चौकातील वाहतूक समस्येसंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत चर्चा करताना आमदार देवयानी फरांदे, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आदी.