नाशिक - पावसाने नुकताच जोर पकडला असताना अनेक रस्त्यांवर खड्डेही पडण्यास सुरुवात झाली आहे. पालिकेच्या सहा विभागांत रस्त्यांच्या डागडुजी दुरुस्तीसाठी दरवर्षी खर्च केली जाणारी तब्बल २४ काेटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम त्यामुळे पाण्यात गेल्याचे चित्र अाहे. सिंहस्थाच्या निमित्ताने तपाेवन परिसरात लाखो रुपये खर्चून खडीकरण केलेल्या रस्त्यांवरही खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.
रस्त्यांच्या कामांची ठेकेदारामार्फत तीन वर्षे देखभाल दुरुस्ती केली जाते. त्यानंतर कामासाठीचा खर्च पालिकेलाच करावा लागतो. त्यासाठी पालिकेच्या वतीने दरवर्षी एका विभागासाठी सुमारे चार कोटी रुपये अशा एकूण २४ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली जाते. सध्या पावसाची संततधार असल्याने उच्चभ्रू वसाहत असलेल्या कॉलेजरोड, कॅनडा कॉर्नर, गंगापूररोडवरील चोपडा लॉन्स मार्ग या भागात रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. चालू मोसमात झालेल्या दोन-तीन मोठ्या पावसांतच रस्त्यावरील डांबर वाहून गेल्यामुळे खडी उघडी पडू लागली आहे. काही ठिकाणी खड्डेही तयार झाले आहेत. भर टाकून खड्डे बुजवण्याचा केविलवाणा प्रकार पालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. कॉलेजरोडवरील भोंसला मिलिटरी शाळेसमोरील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवर ठिगळ जोडले आहे.
खडी उखडणारच...
साधुग्राममध्ये सिंगल फेज खडीकरणाने रस्ते तयार करण्यात आले आहेत. या रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात वाहतूक झाल्यास खडी उखडणारच आहे. फक्त तेथे गाळ तयार होऊ नये नागरिकांसह भाविकांना ते सहज वापरता यावेत, हाच उद्देश आहे. बी.यू. मोरे, मिळकत व्यवस्थापक
सात-आठ वर्षांचा लोटलाय कालावधी
शहरात रिंगरोड वगळता सुमारे ४०० किलोमीटरचे अंतर्गत रस्ते असून, ते तयार करून सात-आठ वर्षांचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे खड्डे पडत असून, पालिकेच्या वतीने डागडुजी सुरू आहे. पी.बी. चव्हाण, कार्यकारी अभियंता