आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संरक्षक जाळ्यांअभावी नवा शाहीमार्ग धोकेदायक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नवीन शाहीमार्ग असलेल्या रस्त्यावर संरक्षक जाळ्या नसल्याने हा रस्ता धोकेदायक बनला आहे. सिंहस्थकाळात या नवीन मार्गाचा वापर होण्याचे संकेत प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. प्रशासनाने या मार्गावरील संभाव्य धोके ओळखून तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

तपोवन परिसरात नवीन शाही मार्ग साकारण्यात आला. हा मार्ग प्रशस्त असल्याने वाहने भरधाव वेगाने ये-जा करतात. मात्र, लक्ष्मीनारायण मंदिराकडून येणारा रस्ता वळणाचा आहे. या रस्त्याच्या कडेला संरक्षक जाळ्या नसल्याने भरधाव जाणार्‍या वाहनास अपघात होऊन वेगात वाहन थेट नदीपात्रात कोसळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, या मार्गावर अनेक ठिकाणी सूचनाफलकदेखील बसविण्यात आलेले नाहीत. ज्यामुळे वाहनचालकांना अंदाज येत नाही. पथदीपांअभावी रात्रीच्या वेळी मार्गक्रमण करणे अत्यंत कठीण आहे. या शाही मार्गावर सिंहस्थात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता या रस्त्याच्या कडेला संरक्षक जाळ्या बसवणे गरजेचे आहे. पुढील धोके टाळण्यासाठी प्रशासनाकडून तत्काळ नियोजनाची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

पादचारी रस्ताही धोकेदायक
सिंहस्थ काळात या रस्त्यावर येणार्‍या भाविकांची मोठी वर्दळ राहणार आहे. या वेळी वाहनांसाठी हा रस्ता बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांकडून तो पादचारी मार्ग म्हणून वापरला जाऊ शकतो. मात्र, या रस्त्यावर संरक्षक जाळ्या नसल्याने पायी जाणार्‍यांसाठीदेखील हा रस्ता धोकेदायक ठरणार आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच योग्य त्या उपाययोजना करून संभाव्य धोका टाळणे गरजेचे आहे.
या उपाययोजना करणे अत्यावश्यक
सिंहस्थ काळात अत्यंत महत्त्वाचा असलेल्या या रस्त्याच्या कडेला संरक्षक जाळ्या बसविणे, पथदीप बसवणे, ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावणे, धोकेदायक ठिकाणी सूचना फलक लावणे, रस्त्यावर आवश्यक तेथे गतिरोधक बसविणे आदी उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.
हे आहेत धोके ...
तपोवन मार्गे गंगेकडे जाण्यासाठी या नवीन रस्त्याचा वापर करण्यात येतो. हा रस्ता वळणाचा आणि धोकेदायक आहे. या रस्त्यावर नवीन वाहनचालकाचे वेगावरील नियंत्रण सुटल्यास वाहन थेट नदीत कोसळण्याची शक्यता आहे. सूचनाफलकांचाही अभाव आहे. रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका अधिक असतो.
नियोजन होणे गरजेचे
सिंहस्थ काळात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता सर्व धोकेदायक रस्त्यांवर संरक्षक जाळ्या बसविणे अत्यंत गरजेचे आहे. रस्त्यावर संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्राधान्याने नियोजन करणे गरजेचे आहे. प्रशासनाने सावध व्हायला हवे.
कृष्णकांत नेरकर, नागरिक