आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिंडीतील वाहनांना टोल माफ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - राज्याच्या सर्व भागांमधून आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणार्‍या वारकर्‍यांच्या वाहनांसाठी राज्यात कुठेही टोल आकारला जाऊ नये, असे आदेश मी आताच संबंधित यंत्रणेला दिले आहेत. ते सर्व टोलनाक्यांपर्यंत पोहोचण्यास काही काळ लागणार असला तरी यापुढे दिंडीच्या वाहनांना टोल माफी मिळणार असल्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात प्रथमच आषाढी वारीतील वारकर्‍यांचा जिल्हा प्रशासनातर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. दरवर्षी वारकर्‍यांना शक्य ते सर्व सहकार्य करण्याचेच शासनाचे धोरण असल्याचे सांगतानाच त्याबाबत काही अपूर्तता असेल तर जिल्हा प्रशासनाकडून त्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांची नेमणूक करण्याचे आदेशदेखील भुजबळ यांनी या वेळी दिले. आमदार जयंत जाधव यांनी वारकर्‍यांच्या वाहनांसाठी होत असलेल्या टोलआकारणीसह त्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांबाबत पालकमंत्र्यांनी लक्ष घालण्याची विनंती केली. तसेच, जिल्हा प्रशासनाच्या वतीने वारकर्‍यांचा अशा प्रकारचा सत्कार व्हावा, ही मागणी प्रदीर्घ काळाने आज पूर्ण होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाकडून प्रथमच हा सोहळा करण्यात आल्याचे सांगितले.

निवृत्तिनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष मुरलीधर पाटील यांनी दिंडीबरोबर पाण्याचे जादा टँकर, प्रत्येक हद्दीतील पोलिसांकडून संरक्षण, घरगुती गॅसचा त्याच दराने पुरवठा व्हावा, टोल माफीबाबतदेखील विचार व्हावा यांसह विविध मागण्या केल्या. चुंभळे परिवाराकडून रथासाठी दीड लाख रुपयांचा धनादेश या वेळी विश्वस्तांकडे सुपूर्द करण्यात आला. दरम्यान, वीणेकर्‍यांच्या सत्कारानंतर वारकरी महासंघाचे पुंडलिकराव थेटे आणि लक्ष्मीकांत शेंडे यांनी जिल्हा प्रशासनाचा सत्कार करण्याची विनंती केली, परंतु ती मुरलीधर पाटील यांच्याकडून मान्य करण्यात नाही. सत्कार सोहळा संपल्यानंतर त्याचीच चर्चा वारकर्‍यांमध्ये सुरू होती.

देवस्थानच्या कामांकडे जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष द्यावे
संतर्शेष्ठ निवृत्तिनाथ महाराज देवस्थानाच्या विकासासाठी साडेतीन कोटी रुपये देण्यात आले आहेत. अनेकदा शासनाकडून निधीच मिळत नाही. इथे निधी उपलब्ध करून दिला असतानादेखील कामांबाबत काही समस्या निर्माण होत असतील तर जिल्हाधिकार्‍यांनी त्यात लक्ष घालून काम मार्गी लावावे, असेही भुजबळ यांनी नमूद केले.