आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुलेआम दादागिरी; पोलिसांची बेफिकिरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- स्थळ : जिल्हा परिषदेजवळील एक वाइन शॉप वेळ : शुक्रवार, रात्री 10.35 वाजता

सुसाट वेगाने आलेली इनोव्हा गाडी ही होंडासिटी कारला अडवते. सात ते आठ टगे उतरून कारमधील व्यक्तीला बेदम चोप देऊ लागतात. पैशांची लूट सुरू होते. प्रसंगावधान राखून ‘दिव्य मराठी’चा प्रतिनिधी भद्रकाली पोलिस ठाण्यापासून ते सहायक पोलिस आयुक्त गणेश शिंदे यांच्यापर्यंत संपर्क साधून पोलिसांना पाठवण्याची विनंती करतो. प्रत्यक्षात मात्र, अर्ध्‍या तासानंतरही कोणीच फिरकत नाही. अखेर पोलिसांचा ‘प्रतिसाद’ बघून बिचारा जखमी रुग्णालयात रवाना होतो.

पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी शहर पोलिसांना शिस्त लावून कार्यक्षम केल्यानंतरही कर्तव्यात कसा ढिसाळपणा होतो, याचा अनुभव ‘याचि देही, याचि डोळा’ नाशिककरांनी अनुभवला. त्र्यंबकरोडवर वर्दळ सुरू असताना घडलेला हा प्रकार अत्यंत संतापजनक होता. इनोव्हामधील टग्यांकडून वाहनचालकाला बेदम मारहाण सुरू होती. त्याच्या गाडीवर दगड टाकून काचा फोडल्या जात होत्या. पैसेही लुटण्यात आले होते. गळ्यातील सोन्याचे लॉकेट हातात पक्के पकडून ते वाचवण्यासाठी संबंधिताची धडपड सुरू होती.

टगे आवाक्यात येणार नाहीत, याची जाणीव झाल्यामुळे नागरिकांनी भद्रकाली पोलिसांना फोन फिरवण्यास सुरुवात केली. हाच प्रकार बघणार्‍या प्रस्तुत प्रतिनिधीनेही भद्रकाली पोलिस ठाण्यातील अंमलदाराला प्रकार कळवला. ‘पाच मिनिटांत पोलिस पाठवतो’, असे सांगितले खरे; मात्र ठाण्यापासून खरोखरच पाच मिनिटे अंतरावर असलेल्या त्र्यंबकरोडवर अर्धा तास झाला तरी पोलिसांचा पत्ता नव्हता. परिणामी, सिनेस्टाइल पाठलाग करणारे टगे मात्र त्याच पद्धतीने मारहाण करून शानमध्ये निघून गेले.

भाऊ ‘ते’ पुन्हा मारतील
इनोव्हामधील टग्यांनी कारमधील मालकाला का मारहाण केली, याचे रहस्य कायम आहे. नाव विचारल्यानंतरही ती व्यक्ती केवळ घाबरून, ‘भाऊ ‘ते’ मला पुन्हा मारतील,’ एवढेच सांगत होता.

पोलिस ठाण्यात तक्रार द्या, असे सांगितल्यावर त्याने प्रथम मला रुग्णालयात जाऊ द्या, असे सांगत जिल्हा परिषदेजवळील एका दवाखान्यात धाव घेतली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरापर्यंत तक्रार नव्हती.