नाशिक - छोट्याशा खेडेगावातील एक सामान्य कार्यकर्ता ग्रामीण भारताचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झालेला असताना काळाने त्याला आपल्यातून हिरावून नेले. केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या जाण्याने कधीही भरून न येणारी हानी झाली आहे, अशी श्रद्धांजली वाहत कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा, असे आवाहन सर्वपक्षीय मान्यवरांनी शोकसभेत केले.
त्रिमूर्ती चौकातील शुभलक्ष्मी मंगल कार्यालयात भाजप नवीन नाशिक विभाग अध्यक्ष जगन पाटील यांनी आयोजित केलेल्या या शोकसभेत राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी मुंडे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. उपमहापौर सतीश कुलकर्णी म्हणाले की, केवळ राजकारण न करता दुर्लक्षित-शेतकर्यांच्या हितासाठी वेळप्रसंगी सरकारविरोधात एल्गार पुकारून त्यांना मुंडे यांनी न्याय मिळवून दिला. शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, गोपाळ पाटील यांनी मुंडे यांच्या नाशिकच्या सहवासातील आठवणी सांगितल्या. या वेळी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, डी. एल. कराड, गोपाळ पाटील, केशव पाटील, संजय नवले, सुरेश पाटील, लक्ष्मण जायभावे, तानाजी जायभावे, कैलास अहिरे, प्रदीप पेशकार, अनिल चांदोडकर, मनोहर काळे, गणेश ठाकूर, रवी पाटील, आर. आर. पाटील, बाळासाहेब गिते, संतोष सोनपसारे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.