आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Robbery At Malegaon, House Owner Sons To Robbery At Rental

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घरमालकाच्या मुलानेच लुटले भाडेकरूला; लाखांचा ऐवज लंपास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव: कॅम्पातील ओंकार कॉलनीत घरमालकाच्या मुलाने चक्क भाडेकरूचेच घर लुटले. या घरफोडीत दोघा चोरट्यांनी जवळपास एक लाख 76 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी रात्री 9 वाजता उघडकीस आली. कॅम्प पोलिसांनी तातडीने सापळा रचत चोरी करणार्‍या घरमालकाच्या मुलासह त्याच्या मित्राला ताब्यात घेतले. दोघांकडून चोरी केलेल्या मालापैकी निम्मा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ओंकार कॉलनीत राहणारे प्रभाकर वाघ यांच्या मालकीच्या घरात रमेश पुंजू नाईक हे ग्रामसेवक कुटुंबीयांसह अनेक दिवसांपासून राहतात. शनिवारी प्रभाकर वाघ यांचा एक मुलगा दवाखान्यात उपचारार्थ दाखल होता. त्याला पाहण्यासाठी सायंकाळी पावणेसात वाजता नाईक हे कुटुंबासह दवाखान्यात गेले होते. हीच संधी साधून वाघ यांचा मुलगा ललित प्रभाकर वाघ (वय 22) व त्याचा मित्र दिनेश पद्माकर भामरे (23) रा. वजीरखेडे, ता. मालेगाव या दोघांनी नाईक यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजाचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला व घरातील कपाटात असलेली 15 हजार रुपयांची रोकड, चार तोळे सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण एक लाख 76 हजार 500 रुपयांचा ऐवज घेऊन दोघेही पसार झाले.
नाईक कुटुंबीय नऊच्या सुमारास घरी आले असता त्यांना घरफोडी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिस उपअधीक्षक रामकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक व्ही. एम. जाधव, उपनिरीक्षक शादरुल व पथकाने तपासाची चक्रे फिरवली. वाघ यांचा मुलगा ललित हा रात्री घरी परतलाच नसल्याने पोलिसांचा संशय वाढला व मध्यरात्रीच्या सुमारास ललितसह दिनेशला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरी केलेल्या मुद्देमालापैकी निम्मा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.