आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सराफाच्या दुकानातून चोरट्यांनी लांबवले दागिने, ४५ हजारांचा ऐवज लंपास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सातपूरच्या श्रमिकनगर येथे सराफी व्यवसाय करणाऱ्या महिलेला बोलण्यात गुंतवून ठेवत दुकानातील ४५ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवारी (दि. १०) घडली. या घटनेने पोलिस यंत्रणा कमालीची चक्रावून गेली आहे.
सातपूर औद्योगिक वसाहतीत शनिवारी (दि. ८) सराफाच्या दुचाकीला चारचाकी वाहनाने धडक देऊन त्याच्याकडील दोन लाख रुपयांची रक्कम लुटण्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडली.
श्रमिकनगर येथील महारुद्र हनुमान मंदिरासमोर मंगरूळकर ज्वेलर्स ही सराफी पेढी आहे. या दुकानात सविता सतीश डहाळे (३६) या बसलेल्या असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने दुकानातून दोनशे रुपयांचे गळ्यात घालण्याचे ताईत विकत घेतले. त्यानंतर पत्नीसाठी सोने घ्यायचे असून, तुम्ही कानातले, अंगठी, टॉप्स पेंडंट प्लास्टिकच्या छोट्या पिशवीत काढून ठेवा असे सांगितले. डहाळे यांनी त्या वस्तू काचेच्या शोकेसमधून बाहेर काढून बाजूला ठेवल्या असता त्याने त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवून हातोहात प्लास्टिक थैली लांबवली. याच वेळी दुकानाबाहेर थांबलेल्या त्याच्या जोडीदाराने दुकानासमोर गाडी आणून दोघांनीही काही कळण्याच्या आत पोबारा केला. दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी सविता डहाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २५ ग्रॅम वजनाचे कानातले टॉप्स, झुबा, रिंग, तीन पेंडंट असा ४५ हजार ५०० रुपयांचा एेवज लंपास झाल्याची तक्रार दिली. घटनास्थळी पोलिस उपायुक्त विजय पाटील, निरीक्षक विलास मेढे यांनी त्वरित धाव घेतली.

पत्नीसत्रास, पतीस अटक
नाशिकसातपूरच्याश्रमिकनगर परिसरात राहणाऱ्या मोनिका विनोद जाधव या विवाहितेला नाशिकरोड येथे राहणाऱ्या पती विनोद याने शारीरिक मानसिक त्रास देऊन मारहाण केल्याची घटना श्रमिकनगर परिसरात घडली. या प्रकरणी पतीला अटक करून त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.