आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगावी धाडसी घरफोडी; साडेचार लाखांचे दागिने लंपास

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव - शहरातील कलेक्टरपट्टा परिसरातील जैन स्थानकाजवळ व्यापा-याच्या घरातून अज्ञात भामट्यांनी तब्बल साडेचार लाख रुपयांचे दागिने व रोकड लंपास केली. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. छावणी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जैन स्थानकाजवळ प्रकाश शांताराम येवले या किराणा व्यापा-याचे घर आहे. रविवारी रात्री 11 वाजेनंतर येवले कुटुंबीय झोपलेले असताना मध्यरात्री एक ते सोमवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी येवले यांच्या घराच्या पाठीमागील खिडकी तोडून बेडरूममध्ये प्रवेश केला. या ठिकाणी असलेल्या कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोकड भामट्यांनी लंपास केली. यात 72 हजार रुपये किमतीची सहा तोळे वजनाची सोन्याची मंगलपोत, 72 हजारांच्या सहा तोळे वजनाच्या सोन्याच्या पाटल्या, 18 हजारांची 15 ग्रॅमचे मंगळसूत्र, 30 हजारांचा सोन्याचा गोफ, नऊ हजाराची अंगठी, बारा हजारांची दहा ग्रॅम वजनाची पोत, 60 हजाराच्या पन्नास ग्रॅम वजनाची पट्ट्याची मंगलपोत, 24 हजारांची 20 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, 24 हजारांच्या 20 ग्रॅमच्या सोन्याच्या बांगड्या, सहा हजाराचे सोन्याचे काना-नाकातील टॉप तसेच सोन्याची चैन, टायटन कंपनीचे घड्याळ असे दागिने व 20 हजार रुपये रोख असे एकूण चार लाख 44 हजार 500 रुपयांची चोरी करून भामट्यांनी पोबारा केला. येवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून छावणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक चंद्रकांत कांबळे हे करीत आहेत.