आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृद्ध महिलेस मारहाण करून दागिने लुटले, नाशिकमधील प्रकार; संशयितास अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नामपूर- सटाणा तालुक्यातील श्रीपूरवडे येथे दारूच्या नशेत असलेल्या तरुणाने पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करीत महिलेस बेदम मारहाण करून दागिने लुटल्याची घटना घडली. मात्र, पोलिसांनी काही तासांत तपास करून संशयित तरुणास अटक केली आहे. 

श्रीपूरवडे येथे सोमवारी (दि. २५) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास दारूच्या नशेत असलेल्या संशयित आनंदा तुकाराम सोनवणे (३५, रा. वाघळे खडी, ब्राह्मणपाडे शिवार) हा पाणी पिण्याच्या बहाण्याने शेनूबाई म्हसदे यांच्या घराकडे वळला. यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य शेतावर गेले होते. शेनूबाई (६०) या घरात एकट्याच होत्या. त्याने या महिलेकडे पाणी मागितले. संशयित ओळखीचा असल्याने पाणी घेण्यासाठी शेनूबाई स्वयंपाक खोलीत गेल्या. त्यांच्यामागे आनंदा सोनवणे हादेखील गेला त्याने महिलेकडे सोन्याची मागणी केली. परंतु, दागिने देण्यास महिलेने नकार देताच त्यांना जबर मारहाण करून दोरीने गळा आवळण्याचा प्रयत्न केला. यामुळे गोंधळलेल्या शेनूबाईंना प्रतिकार करता आला नाही. त्या काही वेळात बेशुद्ध झाल्या. या काळात संशयित आनंदा सोनवणे याने अंगावरील सोन्याचे चार ग्रॅम वजनाचे डोरले, एक ग्रॅम वजनाची पोत, एक चांदीचे कडे असा एकूण वीस ते पंचवीस हजार रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. सायंकाळी कुटुंबीय घरी आल्यावर शेनूबाई बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या. त्यांना नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. शेनूबाई शुद्धीवर आल्यावर त्यांनी घडलेला प्रकार कथन केला. पुढील उपचारासाठी नाशिक येथील रुग्णालयात हलविण्यात आले. जायखेडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट 
मालेगावचेउपविभागीय पोलिस अधिकारी शशिकांत शिंदे, जायखेडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी घटनास्थळी भेट दिली सखोल चौकशी केली. जायखेडा पोलिसांनी काही तासांतच चक्रे फिरवली गुप्त माहितीच्या आधारे संबंधित संशयित हा ताहाराबाद येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, जी. डी. गर्दे, विजय शेवाळे, राजेश सावळे, भालचंद्र नेरकर, शांताराम बोडके, दिलीप गवळी यांनी संशयित आनंदा सोनवणे यास अटक केली. 
बातम्या आणखी आहेत...