आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लुटमारीचे सत्र: नाशिकमध्ये पिंगळे ज्वेलर्सवर मध्यरात्री दरोडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- इंदिरानगर येथील राजीवनगरमधील पिंगळे ज्वेलर्सवर शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकून दुकानातील 110 ग्रॅम सोने व सात किलो चांदीचे दागिने असा तब्बल सात लाख रुपयांचा ऐवज लुटला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रमोद पिंगळे (रा. चेतनानगर) यांचे राजीवनगर येथील विवेक अपार्टमेंटमध्ये पिंगळे ज्वेलर्स हे दुकान आहे. शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून तिजोरी लंपास केली. तिजोरीत 110 ग्रॅम सोन्याचे दागिने व सात किलो चांदीचे दागिने असा तब्बल सात लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. प्रमोद पिंगळे हे सकाळी फेरफटका मारण्यासाठी जात असताना दुकानात चोरी झाल्याचे त्यांना समजले. याबाबत त्यांनी तक्रार दिल्यानंतर इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत.

वृद्धेचे दागिने लुटले
गंगापूररोडवर तोतया पोलिसांकडून दागिने लुटण्याचे प्रकार सुरूच असून, रविवारी भरदिवसा वृद्ध महिलेचे सुमारे 11 तोळे सोन्याचे दागिने लांबविण्याची घटना घडली. यानंतर तासाभरातच एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावत पोलिस यंत्रणेला हिसका दाखविला. सुनीता सूर्यकांत गंधेकर (वय 76, रा. रिचमंडल व्हिला, सावरकरनगर) या घराजवळून जात असताना दुचाकीवरील दोघांनी त्यांना थांबवून पोलिस असल्याची बतावणी करीत पुढे चोर असल्याचे सांगून चाकूचा धाक दाखवत सोने लुटतात, तुमचे दागिने काढून ठेवा, असे सांगितले. घाबरलेल्या गंधेकर यांनी सुरुवातीला नकार देताच त्यांना पुन्हा जोराने सांगत त्यांनी दागिने पिशवीत ठेवले. तोच दोघांनी नजर चुकवून त्यांचे दागिने हातचलाखीने काढून घेत त्या ठिकाणी बनावट दागिने ठेवून पसार झाले. यामध्ये तीन बांगड्या, सहा तोळ्याचे पाटल्या, एक तोळ्याची चैन, अंगठी असा सुमारे तीन लाखांचा ऐवज होता. या प्रकरणी गंधेकर यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात तक्रार देत असतानाच महात्मानगर क्रिकेट मैदानाजवळ सुमनबाई पारसमल बोरा (रा. सिद्धिमंगल अपार्टमेंट) यांना मारहाण करून त्यांची सोनसाखळी पळविल्याचे वृत्त पोलिसांना समजले. या वृद्धेला दुचाकीवरील दोघांनी मागून धक्का देत सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला. यात बोरा यांच्या कानात साखळी अडकल्याने त्यांनी आरडाओरड केली. मात्र, लुटारूंनी कसलीही पर्वा न करता त्यांना जखमी करीत अर्धवट साखळी लंपास केली. या प्रकरणी मुलगा पारसमल बोरा यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयुक्त किती प्रतीक्षा करणार?
महिन्याभरापासून दरोडा, लूटमार, सोनसाखळी चोरी यासारख्या गंभीर घटना घडूनही गंगापूर पोलिसांकडून गुन्हे रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात नाहीत. या पोलिस ठाण्यात सद्यस्थितीत तीन-तीन पोलिस निरीक्षक असून, त्यांच्यात नेमके वरिष्ठ कोण? यामुळे कलह निर्माण झाला असून, या हेवादाव्यांमुळेच गुन्हे नियंत्रणात अडचणी येत असल्याचे खुद्द कर्मचारीच बोलू लागले आहेत. हा प्रकार नेमका थांबणार तरी कधी? त्याचबरोबर पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल आणखी किती गुन्हे घडल्यानंतर प्रभावी उपाययोजना राबवतील, असा सवाल उपस्थित होत आहे.