आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये तरुणीच्या पाठलागाने चोरांना ‘पळता भुई.’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- भाजीपाला खरेदीसाठी दुचाकीवरून जाताना मोटारसायकलवर आलेल्या दोघा चोरट्यांनी आईच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पळ काढल्याचे लक्षात येताच या चोरट्यांचा बहाद्दर तरुणीने दुचाकीवरून अर्धा किलोमीटर पाठलाग केला. मात्र, अपघात झाल्याने चोरटे मोटारसायकल सोडून पळाल्याची घटना सोमवारी जेलरोड परिसरात घडली.

जेलरोड रस्त्यावर मध्यवर्ती कारागृहासमोर सोमवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास परिसरातील एक महिला आपली मुलगी दुर्गा हिच्यासोबत दुचाकीवरून भाजीपाला खरेदीसाठी जात असताना मागून पल्सर मोटारसायकलवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 11 ग्रॅमची सोन्याची पोत चोरून पळ काढला. लगेचच दुर्गाने आईला गाडीवरून खाली उतरवून चोरट्यांचा मध्यवर्ती कारागृह ते पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलपर्यंत पाठलाग केला. पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलसमोर चोरट्यांनी एका मोटारसायकलला धडक दिल्याने ते खाली पडले. त्यानंतर पाठलाग करणार्‍या दुर्गाला बघून भेदरलेल्या चोरट्यांनी तिच्या दुचाकीला जोरात लाथ मारली. यामुळे दुचाकीचे कव्हर तुटले. त्यामुळे तोल गेल्याने नाईलाजास्तव तिला पाठलाग थांबवावा लागला आणि चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. दुर्गाने चोरट्यांच्या पल्सर मोटारसायकलचा क्रमांक (एमएच 15, 5611) पोलिसांना दिला. या धाडसाबद्दल दुर्गाचे कौतुक होत आहे. पोत चोरी प्रकरणी नाशिकरोड पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. तसेच चोरट्यांच्या मोटारसायकलचा क्रमांक देऊन 24 तास उलटले तरीही पोलिसांकडून कुठलाही तपास झालेला नाही.( चोरट्यांचा पाठलाग करणार्‍या मुलीचे मूळ नाव बदलले आहे. तिच्या पालकांच्या इच्छेखातर ते प्रसिद्ध केलेले नाही.)