आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Robbery Issue At Nashik Cidco Nine Robber Arrested At Nashik

दरोडेखोरांची टोळी पोलिसांकडून जेरबंद; कारसह नऊ लाखांचा माल जप्त

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक (सिडको)- अंबड औद्योगिक वसाहतीत शस्त्रांचा धाक दाखवत दरोडा टाकणार्‍या आंतरराज्य टोळीला जेरबंद करण्यात अंबड पोलिसांना यश आले आहे. संशयितांकडून इनोव्हा कार व तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

वेल्डकॉन कंपनीत 15 जुलैला रात्री दोन वॉचमन व कामगारांना हत्याराचा धाक दाखवून मीटर बॉक्स, तांब्याचे जॉब, रोख रक्कम, मोबाइल असा सुमारे चार लाखांचा माल लंपास केल्याची घटना घडली होती. कंपनीचे मालक विजय पडोळ यांच्या तक्रारीनुसार अंबड पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हय़ात कुठलाही पुरावा संशयितांनी घटनास्थळी अथवा शहरात इतरत्र न सोडल्याने आरोपीचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिस यंत्रणेसमोर उभे राहिले होते.

गेल्या महिन्यांत पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी पोलिस ठाण्यांच्या प्रलंबित गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश दिले होते. उपआयुक्त डॉ. डी. एस. स्वामी, सहायक आयुक्त हेमराज राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण बोरकर यांनी तपासाची सूत्रे फिरवली. परराज्यातील पोलिसांशी संपर्क साधत ठिकठिकाणी पथके रवाना करण्यात आली होती. अखेरीस पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले.

वेगवेगळ्या ठिकाणी केली अटक
वकील रामकृष्ण गुप्ता (उत्तर प्रदेश), मेहबूब मोहंमद खान, नईम हुसेन रजा, मेहुद्दीन (तिघे गुजरात) मुमताज अली, मंगळू कलाम चौधरी, इन्तेहाज अली खान, रमजान अली चौधरी, सिकंदर अली अकबर यांचा अटक केलेल्यांमध्ये समावेश आहे. आणखी आठ-दहा जणांचा शोध सुरू आहे. या संशयितांना गुजरातमधील बडोदा, सुरत, वापी, दमण तसेच राज्यातील बोईसर, भिवंडी अशा ठिकाणांहून वेगवेगळ्या पथकांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता 31 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

तीन लाखांचे तांब्याचे जॉब जप्त
या टोळीकडून सुमारे तीन लाखांचे तांब्याचे जॉब, इतर साहित्य व इनोव्हा कार असा एकूण नऊ लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे.