आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढत्या घरफोड्यांमुळे मालेगावकर धास्तावले

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव - शहरातील कलेक्टरपट्टा वसाहतीत गेल्या दोन महिन्यांपासून जबरी चो-या व घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झालेली असतानाच मंगळवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालीत तीन मोटारसायकली लांबविल्या, तर एका ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न केला. वाढत्या चो-यांमुळे धास्तावलेल्या रहिवाशांनी येत्या शुक्रवारी प्रांत कार्यालयावर मोर्चा नेण्याचा निर्धार केला आहे.
कलेक्टरपट्टा भागातील वीर सावरकरनगर व बागुल कॉलनीत मंगळवारी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी धुमाकूळ घातला. जवळपास सहा मोटारसायकली चोरून नेण्याचा या चोरट्यांचा इरादा होता. यात ते सफलही झाले होते. मात्र, काही रहिवाशांना चोरांची कुणकुण लागल्याने आरडाओरड होताच चोरटे तीन मोटारसायकली रस्त्यावरच फेकून तीन मोटारसायकली घेऊन पसार झाले. याच कालावधीत बागुल कॉलनीतील एका घराच्या पाठीमागील खिडकी तोडून घरफोडी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, घरातील महिलांना तोडफोडीचा आवाज आल्याने त्यांनी आरडाओरड केली असता घाबरून चोरटे पसार झाले. बुधवारी सकाळी हा प्र्रकार कर्णोपकर्णी संपूर्ण - वसाहतीत पोहोचल्याने रहिवासी एका ठिकाणी एकत्र आले. निसर्गनगरमधील सामाजिक कार्यकर्ते विनोद कचवे यांनी महिला, पुरुषांना घेऊन थेट छावणी पोलिस ठाणे गाठले. या वेळी पोलिस निरीक्षक चंद्रकांत कांबळे यांना मंगळवारी रात्री घडलेले प्रकार तसेच गत दोन महिन्यांत घडलेल्या चार ते पाच घरफोड्यांविषयी रहिवाशांनी जाब विचारला असता, कांबळे यांनी दोन घरफोड्यांचा तपास लावण्यात यंत्रणेला यश आले असून, उर्वरित घटनांचादेखील छडा लावण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यांच्या मोटारसायकली चोरीस गेल्या त्यांच्या तक्रारी पोलिसांनी नोंदवून घेतल्या.
शुक्रवारी मोर्चा - कलेक्टरपट्टा भागातील वाढत्या घरफोड्या, चो-यांमुळे रहिवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलिस यंत्रणेला चो-यांचे प्रमाण रोखण्यात सपशेल अपयश येत आहे. अशातच येथे पथदिव्यांची सोय नसल्यामुळे भामट्यांना रात्रीचे रान मोकळे होत आहे. मागणी होऊनही मनपाकडून पथदीप बसविले जात नाहीत, तर छावणी पोलिसही रात्रीची गस्त वाढवित नाहीत. - विनोद कचवे, सामाजिक कार्यकर्ते