आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोळखी गुन्हेगारांनी एकत्र येत टाकला सराफी पेढीवर दरोडा; तिघांना सहा दिवसांची कोठडी, दोघे फरार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड- एकमेकांशी अपरिचित गुन्हेगारांना एकत्र आणून नाशिकरोडची शहाणे सराफी पेढी साफ करण्याचा फिल्मी स्टाईल कट रचत सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. दत्तमंदिर रस्त्यावरील शहाणे सराफ पेढीवर दरोडेखोरांनी रविवारी भरदिवसा गोळीबार करून दरोडा टाकला. सराईत गुन्हेगार मुरली जिन्नप्पा पुजारी याने दरोडा टाकण्याच्या काही तास अगोदर एकमेकांना ओळखत नसलेल्या गुन्हेगारांना एकत्र करून अतिशय चलाखीने पेढी लुटण्याचा कट रचला. मात्र, संचालक अभय व सागर शहाणे यांनी जिवाची पर्वा न करता दरोडेखोरांचा प्रतिकार केल्याने तो तडीस गेला नाही. दोघा बंधूंनी मोठी हिंमत दाखवत चौघा दरोडेखोरांना पळवून लावले. टोळीतील यादव व खान फरार आहेत. त्यांच्या तपासासाठी पथक रवाना झाले आहे. दरोड्यात वापरलेली व्हर्ना कार विलेपार्ले येथून, तर नंबरप्लेट पुण्यात चोरल्याचे तपासात उघड झाले.
गोळीबारात जखमी झालेल्या अभय शहाणे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. पोलिसांनी थरारक पाठलागानंतर अटक केलेल्या हैदर अली गब्बू शेख, मुरली पुजारी व शेषनाथ सुदामा उपाध्ये यांना न्यायाधीश ए. डी. वामन यांनी 2 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली. सरकारी वकील अंजला नवगिरे यांनी दरोडेखोरांकडून एक पिस्तूल, सराफाचा चोरलेला मोबाइल हस्तगत करण्यासाठी व दरोडेखोरांनी इतर राज्यात केलेल्या गुन्ह्यांच्या तपासासाठी सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. अ‍ॅड. आनंद भोसले यांनी संशयितांची बाजू मांडली.