आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कौतुकास्पद: टाकाऊ वस्तूंच्या ‘प्रेमा’तून साकारला रोबोट!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- ‘टाकाऊपासून टिकाऊ’ ही संकल्पना वापरून सतरंजी, फुलदाणी, वॉल सेट्स, प्लेन कापडाची फुले, पायपुसणे अशा अनेक वस्तू तयार केल्या जातात. मात्र, सेंट फिलोमिना शाळेतील आठवी इयत्तेच्या विद्यार्थ्याने जुन्या खेळण्या आणि रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा उपयोग करून चक्क रोबोट बनवण्याची किमया केली आहे.

काही व्यक्तींमध्ये सृजनशीलता ठासून भरलेली असते. त्यातीलच एक फिलोमिना शाळेतील प्रेम अमित पगारे हा विद्यार्थी. त्याने काही दिवसांपूर्वी घरातील तुटलेल्या प्लास्टिकच्या खेळण्या जमा केल्या. या खेळण्यांचा चपखलपणे वापर करीत रोबोट बनविण्याचा प्रयत्न केला. त्याचा हात स्ट्रॉपासून बनविलेला असून, चेहर्‍यासाठी हेड फोन व डोळ्यांसाठी एलईडी लाईट्सचा वापर केला आहे. तसेच बाटलीला चाके लावून ते रोबोटला जोडण्यात आले आहेत. तसेच, प्लास्टिकच्या डब्यापासून रिमोटही तयार केला आहे. त्यात संगणकाच्या माऊसचा वापर केला आहे. चाके आणि रिमोट एका वायरने जोडण्यात आल्याने हा रोबोट अक्षरश: रिमोटच्या साहाय्याने चालू शकतो. विशेष म्हणजे, कोणाचेही मार्गदर्शन न घेता प्रेमने हा आविष्कार साकारला आहे. त्याच्या या रोबोटचे प्रात्यक्षिक शाळेत दाखविण्यात आल्यानंतर शिक्षकांनीही तोंडात बोटे घातली. प्रेमने लहानपणापासूनच इंजिनिअर होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे.

वडिलांचे स्वप्न‘प्रेम’
प्रेमचे वडील अमित पगारे यांचे पूना रोडवर किराणा दुकान होते. महामार्गाच्या रुंदीकरणात काही दिवसांपूर्वीच हे दुकान नेस्तनाबूत करण्यात आल्याने ते चेहडी येथील छोट्याशा शेतीच्या तुकड्यात शेती करून उदरनिर्वाह करीत आहेत. अशा बिकट परिस्थितीतही ते प्रेमला महागडे शिक्षण द्यायला तयार आहेत. त्यासाठी पोटाला चिमटा घेण्याची वेळ आली तरी चालेल, असेही ते म्हणाले.

प्रयोगशील विद्यार्थी
प्रेम हा आमच्या शाळेतील हुशार विद्यार्थी आहे. तो पहिल्यापासूनच प्रयोगशील आहे. रोबोट तयार करण्याची त्याची युक्ती तर भन्नाटच म्हणावी लागेल. त्याचे कौतुक करावे तितके कमीच आहे.
-सिस्टर जेनिफर, मुख्याध्यापिका, सेंट फिलोमिना हायस्कूल