आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘रोमिओ बोला प्यार की’ची वितरकांनी केली ‘ऐसी की तैसी’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव- मुंबई चित्रपटसृष्टी अर्थातच बॉलीवूडशी तोलामोलाचा व मुंबईचे तंत्रज्ञान वापरूनच मालेगावकरांनी बनवलेल्या ‘रोमिओ बोला प्यार की ऐसी की तैसी’ या कॉमेडी हिंदी चित्रपटाच्या वितरणासाठी वितरकांकडून अत्यंत सापत्न वागणूक मिळाली. त्यामुळे हा चित्रपट देशभर प्रदर्शित करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून असलेल्या कलाकारांच्या मेहनतीला कोलदांडा घातला गेला आहे. वितरकांनी केलेल्या दुर्लक्षामुळे अखेर मालेगावच्या स्थानिक ‘सेंट्रल’ चित्रपटगृहात आज तो रिलीज करावा लागला. त्याला मालेगावकरांनी मात्र ‘हाऊसफुल्ल’ प्रतिसाद दिला.
मालेगावात होणाºया चित्रपट निर्मितीचे कौतुक बॉलीवूडसह थेट हैद्राबाद, दिल्लीपर्यंत झाले आहे. मालेगावात येऊन अनेकांनी डॉक्युमेंट्री बनवून पुरस्कार पटकावले आहेत. अमिताभ बच्चन यांनीही मुंबईच्या एका कार्यक्रमात मालेगावकरांचे कौतुक केल्याचे राज्यभर चर्चेत आले होते. या स्पर्धेत येथील हरहुन्नरी निर्माते अ‍ॅड. संजय मेहता यांनी मोठी गुंतवणूक करून मुंबईच्या दर्जाचा चित्रपट बनवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली. त्याला स्थानिक कलाकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बॉलीवूड तसेच मालिकांमधील आघाडीच्या अभिनेत्रींना सहभागी करून घेण्यात आले.
तंत्रज्ञानदेखील मुंबईचे वापरण्यात आले. अर्थात ज्यांनी बॉलीवूडमध्ये आपले अव्वल दर्जाचे तंत्रज्ञान वापरून चित्रपटाचा गुणवत्ता ठरवली, असे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. चित्रपट सॅटेलाइटद्वारे एकाच दिवशी राज्यातील 100पेक्षा अधिक व देशभरातील काही चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्याची कलाकार व निर्मात्यांची महत्त्वाकांक्षा होती. 6 जुलैचा दिवस प्रदर्शनासाठी निश्चित करण्यात आला होता. परंतु, चित्रपट जेव्हा मुंबईत वितरकांकडे नेण्यात आला तेव्हा त्याच्या दर्जाची तुलना न करता ‘मालेगावचा चित्रपट’ अशा मागास दृष्टीने त्याकडे पाहिले गेले. त्यामुळे 6 व 13 तारखेला येणा-या इतर नियोजित चित्रपटांनाच प्राधान्य देण्याचा प्रयत्न झाला.
विशेष म्हणजे 6 व 13 तारखेला जे चित्रपट लागले, त्यांच्या तुलनेत मॉलीवूडचा ‘प्यार की ऐसी की तैसी’ तोलामोलाचा ठरणारा आहे, याची खातरजमाही झाली नाही. त्यामुळे निर्माते, दिग्दर्शक यांना नाईलाजाने शुक्रवारी येथील सेंट्रल चित्रपटगृहातच तो रिलीज करावा लागला. या फुल्ल धमाल कॉमेडी चित्रपटाने दुपारच्या दोन्ही शोला मालेगावकरांची गर्दी खेचली. परंतु, प्रदर्शनाबाबत मिळालेल्या सापत्न वागणुकीची शासन स्तरावरून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मालेगावकरांकडून होत आहे. मालेगाव तर नेहमीच उपेक्षित राहिले आहे. मात्र, आता येथील कलाही उपेक्षिली जात असल्याचा संदेश यातून गेल्याची भावना आहे.
प्रयत्न सुरूच ठेवणार- मुंबईच्या दर्जाचा चित्रपट मालेगावात बनवून सॅटेलाइटद्वारे प्रदर्शित करण्याच्या कल्पनेनेच कलाकार उत्साहित होते. परंतु, तो राज्यभर प्रदर्शित करण्यात तांत्रिक अडचणी सांगण्यात आल्या. तरीदेखील आम्ही प्रयत्नशील आहोत. किमान 100 चित्रपटगृहांमध्ये तो दाखवण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.- अ‍ॅड. संजय मेहता, निर्माते
उत्कंठा शिगेला- मोठ्या मेहनतीने ‘प्यार की ऐसी की तैसी’ची निर्मिती झाली आहे. मुंबईचे तंत्रज्ञान व तांत्रिकही येथे सहभागी झाले होते. चित्रपट प्रदर्शित होण्याची उत्कंठा नियोजनापेक्षा अधिक ताणली गेली. त्यामुळे अधिक लांबू नये, याकरिता स्थानिक चित्रपटगृहात तो रिलीज करावा लागला. मालेगावकर प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता राज्यभरातही त्याला प्रतिसाद राहील, अशी आशा आहे.- कैलास शर्मा, सहायक निर्माता