आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणाच्या पंचसूत्रीवरच विद्यार्थ्यांचे भवितव्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शिक्षकांना अशैक्षणिक कामांमध्ये अडकवता त्यांना गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. गुणवत्तेला चालना देण्यासाठी शिक्षकांनी उपक्रमशीलता आणि प्रयोगशीलता जोपासली पाहिजे. पालकांनीही विद्यार्थ्यांवर योग्य वयात चांगले संस्कार घडवले तर विद्यार्थीही शिक्षकांप्रति आदराची भावना ठेवतील. संस्कारक्षम पिढी घडली नाही तर सामाजिक नीतिमत्तेची घसरण होऊन विधायक समाजाच्या जडणघडणीतही अडथळे निर्माण होतील. बदलत्या सामाजिक स्थित्यंतरात शिक्षक, विद्यार्थी, पालक, प्रशासन आणि संस्थाचालक या सर्वांच्या समन्वयातून विद्यार्थीकेंद्री शिक्षणपद्धतीची प्रभावी अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवायला हवा, असा सूर शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून ‘दिव्य मराठी’तर्फे आयोजित राउंड टेबल कॉन्फरन्समध्ये व्यक्त करण्यात आला.
‘दिव्य मराठी’ राउंड टेबलमध्ये शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचा चर्चासत्रातील सूर
{ बोगस पटसंख्या रोखण्यासाठी शिक्षण विभागाने वेबसाइटद्वारे विद्यार्थ्यांची एकत्रित माहिती संकलित करावी.
{ प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी.
{ विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनाही अनुदानित शाळेप्रमाणे वेतन मिळावे यासाठी प्रयत्न व्हावेत.
{ पालकांनी आपली मानसिकता बदलून विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडवले पाहिजे.
{ शिक्षणहक्क कायद्यातील जाचक तरतुदी शिथिल करून आनंददायी शिक्षण व्यवस्था निर्माण व्हावी.
{ शिक्षकांची अशैक्षणिक कामांतून मुक्तता करून त्यांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ दिला जावा.
{ गुणवत्ता सुधार आणि शिक्षक प्रशिक्षण या कार्यक्रमांची आखणी करून शिक्षकांना प्रोत्साहित करावे.

कृतिशील उपक्रमांतून व्हावे सर्वच विषयांचे अध्ययन-अध्यापन
अध्यापनाचे कामकरताना पारंपरिक पद्धतीऐवजी आता ज्ञानरचनावाद अाणि कृतिशीलता याद्वारे शिकवले जात आहे. पालकांनीही विद्यार्थ्यांना यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. शिक्षणहक्क कायद्यामुळे अनेक बंधने आली असली तरी त्यावर मात करत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करावा. -लतिका पाटील, मुख्याध्यापिका, सारडा कन्या विद्यालय

बोगस पटसंख्येला चाप बसणार
शिक्षण विभागातर्फेविविध लाभदायी योजना राबविल्या जात असतात. त्याचा गरजू पात्र विद्यार्थ्यांना फायदा व्हावा यासाठी आधुनिक तंत्रज्ञांचा अंतर्भाव करून पारदर्शकता आणली जात आहे. सरल या संगणक प्रणालीद्वारे बोगस पटसंख्येला चाप बसणार असून, विद्यार्थ्यांची ऑनलाइन ट्रान्सफरची सुविधाही सुरू झाली आहे. पुढील वर्षभरात विद्यार्थ्यांची माहिती आधारलिंक होणार असल्याने प्रत्येकाला स्वतंत्र आयडीही मिळू शकेल. त्यातून विविध लाभदायी योजनांमध्ये पारदर्शकता येईल. -नितीन उपासनी, प्रशासनाधिकारी, मनपा

गुणवत्ता सुधार, प्रशिक्षण हवे
शालेय स्तरापासून गुणवत्तापूर्णशिक्षण दिले जात नसल्याने विद्यार्थी स्पर्धेत मागे पडतात. उच्च शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येतात. अनुदानित घटकांतील शाळांमधील गुणवत्तेचा आलेख खाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी गुणवत्ता सुधार, शिक्षक प्रशिक्षण यांसारखे कार्यक्रम घेण्याची गरज आहे. त्यातून शिक्षकांनाही आधुनिक ज्ञान मिळू शकेल. अध्यापनाचे तंत्र बदलल्यास विद्यार्थ्यांच्या अडचणी सुटूशकतील. - डॉ. प्रशांत सूर्यवंशी, संचालक, एमजीव्ही आयएमआर

शिष्यवृत्ती वेळेवर मिळावी
विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी शिक्षणहक्क कायद्यातील तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी होण्याची गरज आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी एकत्र माहिती मिळू शकेल, यासाठी शिक्षण विभागाने वेबसाइट सुरू करण्याची गरज आहे. एकच विद्यार्थी अनेक शाळांत प्रविष्ट असल्याने अचूक पटसंख्या माहिती होत नाही. त्यामुळे शिष्यवृत्ती देण्यातही अडथळे येतात. शासनाने शिष्यवृत्ती लवकरात लवकर अदा करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकेल. शिक्षकांचा त्रासही कमी होईल. -नंदलाल धांडे, मुख्याध्यापक, उन्नती शाळा

मानसिकता बदलाची गरज
शिक्षकांनी विद्यार्थ्यांनारागवायचं नाही, छडी मारायची नाही, नापास करायचे नाही, असे नियम आल्याने शिक्षकांवर अनेक मर्यादा आल्या आहेत. विद्यार्थ्यांना घडवताना अनेक अडचणी येत आहेत. शिक्षण विभागाच्या चुकीच्या धोरणांमुळे शिक्षकांपुढे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. जाचक नियमांमध्ये शिथिलता आणण्याची गरज अाहे. सर्वसमावेशक तरतुदी असेल तर त्याची अंमलबजावणीही करता येऊ शकेल. पालकांनी आपली मानसिकता बदलून विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार केले पाहिजे. -रमेश अहिरे, मुख्याध्यापक, आदर्श शाळा

जागे होण्याची गरज
मुलांना शिक्षण देण्याचे काम शाळा, महाविद्यालयांतून होत असले तरी शिस्त लावण्याचे तसेच चांगले संस्कार घडविण्याचे काम कुटुंबापासून व्हायला हवे. नोकरीनिमित्त आई-वडील बाहेर असतात. आपल्या मुलांना वेळ देऊन त्यांनी चांगले-वाईट याची माहिती द्यायला हवी. शिक्षक तळमळीने शिकवत असला तरी त्यांचेही प्रश्न समजून घेण्याची गरज आहे. कुटुंब पद्धतीही बदलल्याने मुलांना जास्त वेळ देता येत नाही. सोशल मीडियामुळे कुटुंबात संवाद हरवत चालला आहे. त्याचेही परिणाम दिसून येत आहेत. -प्रा. सुनील रुणवाल, संचालक, सागर क्लासेस

शिक्षकांना शाश्वती हवी
अनुदानित विनाअनुदानित तत्त्वावर चालणाऱ्या शाळांमध्ये सारखेच अध्यापनाचे काम चालते. परंतु, त्यांना मिळणाऱ्या वेतनामध्ये मोठा फरक आहे. तसेच, शिक्षकांना अतिरिक्त ठरविले जाते. त्यातून समायोजनाचा प्रश्न निर्माण होत आहे. शिक्षकांमध्ये असुरक्षिततेची भावना असल्याने त्याचा परिणाम गुणवत्तेवर होऊ लागला आहे. शिक्षकांना शाश्वती मिळावी, यासाठी प्रयत्नांची गरज अाहे. शासनस्तरावरून प्रयत्न झाल्यास शिक्षकांचा प्रश्न निकाली निघू शकतो. त्यासाठी पाठपुरावाही करणे गरजेचे आहे. - डॉ. सूर्यभान वाजे, प्राचार्य, मविप्र शिक्षणशास्त्र कॉलेज

संस्कारक्षम समाज घडविण्याची गरज
विद्यार्थीचुकीच्या घटनांचे समर्थन का करू लागले, याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. शिक्षक, विद्यार्थी, पालक या सर्वांनी आत्मपरीक्षण करून स्वत:मध्ये बदल केला तर परिवर्तन होण्यास सुरुवात होईल. पालकांनीही मुलांवर योग्य वयात संस्कार रुजविले पाहिजे. शिक्षकांप्रति आदराची भावना ठेवायला हवी. स्वत:बद्दल आदर निर्माण व्हायला हवा. -प्रकाश कडवे, प्राचार्य, के. के.वाघ पॉलिटेक्निक कॉलेज

विनाअनुदानित शाळांबाबत धोरण ठरवावे
शिक्षण व्यवस्थेत केवळ शिक्षक विद्यार्थी हे दोनच घटक महत्त्वाचे असतात असे नव्हे, तर संस्थाचालक, प्रशासन, विद्यार्थी, शिक्षक, पालक या सर्वांच्या समन्वयातून शिक्षण व्यवस्था चालत असते. शासनाने अनुदानित विनाअनुदानित असे वर्गीकरण केल्याने विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबितच आहेत. शिक्षकांना शिक्षक म्हणूनच वेतन दिले जावे. त्यासाठी शासनाच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. शिक्षणतज्ज्ञांच्या मदतीने धोरण आखले जावे. -विलास देशमुख, प्राचार्य, मविप्र समाजकार्य महाविद्यालय

योग्य दिशा मिळाली तर विद्यार्थ्यांना सर्वांगीण प्रगती साधणे होईल शक्य
विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण, संस्कार शिस्तीचे महत्त्व पटवून दिले तर त्यांची भविष्यात प्रगती नक्की होईल. शिक्षकांनी पारंपरिक पद्धतीने शिकवता विद्यार्थी शिक्षक असा दुहेरी संवाद घडवून अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया करायला हवी. यशाचे शिखर गाठण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये यायला हवी. -अशोक हिरे, महात्मा गांधी विद्यामंदिर

शालेय शिक्षणप्रणालीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अंतर्भाव हवा
पाश्चात्त्य देशांमध्ये शिक्षणपद्धतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याने शिक्षणाचा दर्जाही उंचावला आहे. आपल्या देशातील शाळांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करून इ-लर्निंग प्रणाली सुरू केली पाहिजे. शिक्षकांनीही तंत्रस्नेही प्रशिक्षण घेऊन विद्यार्थ्यांना प्रगत केले पाहिजे. -एम. जी. कुलकर्णी, ज्येष्ठ सेवानिवृत्त प्राध्यापक

अशैक्षणिक कामांपासून शिक्षकांना कायमचे मुक्त करण्याची गरज
शिक्षकांना वेगवेगळ्याअशैक्षणिक कामांमध्ये अडकवले जात असल्याने त्याचा गुणवत्तेवर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे शिक्षकांना अशैक्षणिक कामांतून मुक्त करत पूर्णवेळ शिक्षणासाठी उपलब्ध करून दिले पाहिजे. शिक्षकांनीही गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न केले तर विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होऊ शकेल. -नीलेश ठाकूर, रचना स्कूल

शिक्षकांप्रति विद्यार्थ्यांनी आदरयुक्त भावना व्यक्त करायला हवी
करिअरला योग्यदिशा देणाऱ्या शिक्षकांचा आदर राखणे महत्त्वाचे आहे. गुरूंचा सन्मान करणे नतमस्तक होणे हे भारतीय परंपरेचे वैशिष्ट्य आहे. शिक्षकांचा सन्मान ही कौतुकाची थाप असून, त्यांना ती कार्यप्रेरित करत असते. प्रयोगशीलता जोपासून शिकवले तर विद्यार्थीप्रिय अशी ओळख निर्माण होईल. -शशिकांत देसले, शिक्षक, श्रीमती नर्गिंस दत्ता कन्या विद्यालय

शिक्षकांची जबाबदारी वाढली
शिक्षणा बरोबरच समाजाची विधायक जडणघडण करणाऱ्या शिक्षकांची जबाबदारी वाढली आहे. बदलत्या सामाजिक परिस्थितीत अनेक आव्हाने निर्माण केली आहेत. नव्या पिढीवर चांगले संस्कार घडवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. शिक्षक पालक यांच्यातही संवाद असायला हवा. मुख्याध्यापकांनी स्वत: एखादी तासिका घेऊन विद्यार्थ्यांचे समुपदेशन, मार्गदर्शन केले पाहिजे. -रमेश देशमुख, ज्येष्ठ शिक्षक

शिक्षणहक्कची प्रभावी अंमलबजावणी व्हावी
शिक्षण हक्ककायदालागू झाल्यानंतर सर्वांना शिक्षणाचा अधिकार मिळाला. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून प्रगत करण्यासाठी प्रयत्न होऊ लागले आहेत. सर्वंकष मूल्यमापनातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे शक्य आहे. त्यासाठी शिक्षणहक्क कायद्याची, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानाची प्रभावी अंमलबजावणी शिक्षकांनी केली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा विकास झाला पाहिजे. -प्रा. सुनील बच्छाव, संचालक, इन्स्पिरेशन

व्यासंगातून होईल प्रबोधन
सामाजिकपरिवर्तनानेअनेक प्रश्न उभे केले आहेत. शासकीय आणि खासगीकरण यांतील दरी वाढतच चालल्याने शिक्षण व्यवस्थेसह अनेक क्षेत्रात दरी निर्माण होऊ लागली आहे. शिक्षणामध्ये गुणांवरच मूल्यमापन होऊ लागले आहे. नीतिमूल्यांची शिकवण दिली जात नसल्याने सामाजिक नीतिमत्तेची घसरण झाली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शिक्षकांवर जबाबदारी अाली असून, त्यांनी अध्यापनाबरोबरच मूल्यशिक्षणाचे संस्कार रुजवले पाहिजे. शिक्षकांनी पुस्तकांचे वाचन करून व्यासंग वाढवला पाहिजे. -दिलीप गोटखिंडीकर, ज्येष्ठ शिक्षक

शाळांमधून आता कौशल्य विकासाचे धडे
बदलतीस्थित्यंतरेलक्षात घेऊन आता दीर्घ कालावधीऐवजी आता कमीत कमी कालावधीत अभ्यासक्रमात बदल करण्याचा विचार सुरू आहे. समाजाची विधायक जडणघडण करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून, शिक्षण संस्थांवरची जबाबदारी वाढली आहे. विद्यार्थी उपयोगी कौशल्य शिक्षण आता शाळांमधून दिले जाणार असल्याने व्यावसायिक शिक्षणालाही मदत होऊ शकेल. -नवनाथ आैताडे, शिक्षणाधिकारी, जि. प.नाशिक
बातम्या आणखी आहेत...