आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्साही राष्‍ट्रीय स्वयंसेवकांवर पृष्पवृष्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शहरात रविवारी सकाळी आणि सायंकाळी बॅँडपथकाच्या तालावर शिस्तबद्ध संचलन करण्यात आले. या संचलनात आठ-दहा वर्षांच्या बालकांपासून पंचाहत्तरीपर्यंतचे ज्येष्ठ स्वयंसेवक मोठय़ा उत्साहाने सहभागी झाले होते.

सायंकाळी साडेचार वाजता पोलिस आयुक्तालयासमोरील शिरवाडकर जॉगिंग ट्रॅकच्या प्रवेशद्वारानजीक ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर पारंपरिक बॅँडवर आस्तेकदम संचलन करण्यात आले. पी. अँण्ड टी. कॉलनीतून निघालेले हे पथक संचलन करीत सिटी सेंटर मॉल आणि तेथून पुन्हा शरणपूररोडवरील शुभारंभ स्थळापर्यंत येऊन विसर्जित करण्यात आले.

नाशिकरोडला पुष्पवृष्टी
‘भारत मातेची जय’, ‘वंदे मातरम’च्या नागरिकांच्या गगनभेदी घोषणा, फुलांची वृष्टी, बॅन्डचा एक सूर-एक ताल अन् स्वयंसेवकांची एक चाल नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती. हे चित्र होते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी रविवारी सकाळी 7 वाजता दसर्‍यानिमित्त नाशिकरोड येथे केलेल्या संचलनाचे. गोरेवाडी येथील आय. एस. पी. मराठी शाळेपासून संचलनाला सुरुवात होऊन प्रसाद धुनी येथील गजानन पार्क येथे समारोप झाला.

संचलन करणार्‍या स्वयंसेवकांवर नागरिकांनी फुलांची वृष्टी करीत संचलनाची शोभा वाढवली. या वेळी संचलन प्रमुख नितीन जाधव, सुबोध कुळकर्णी, उदय शेवतेकर, डॉ. मधुकर दातार, विवेक बकरे, सुरेश नाशिककर, मारुती कुलकर्णी, रवींद्र वैद्य, विनायक उपाध्ये आदींसह शेकडो स्वयंसेवक सहभागी झाले होते.

‘शिवसंस्कृती’तर्फे मिरवणूक
विजयादशमीनिमित्त शिवसंस्कृती ढोल पथकातर्फे ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. बी. वाय. के. महाविद्यालयापासून मिरवणुकीची सुरुवात होऊन मॉडेल कॉलनी येथे समारोप झाला. या वेळी अरुण मुगंसे, सुशांत धारणकर, अभिजित पवार, महेश गोसावी, एम. लेले, प्रियंका कुंडलीकर, सचिन धारणकर आदी उपस्थित होते.