आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आरटीओ’चे चार कोटींचे सीमोल्लंघन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- बाजारात आर्थिक मंदीचे सावट निर्माण झालेला असतानाही नवरात्रोत्सव आणि दस-याच्या मुहूर्तावर वाहन बाजारात मात्र खरेदीचा उत्साह दिसून आला. प्रादेशिक परिवहन विभागालाही आठवडाभराच्या कालावधीत नव्या वाहनांच्या नोंदणीतून सुमारे चार कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.


प्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय दस-याची सुटी असतानाही सुरू ठेवण्यात आले होते. त्या पाठोपाठ सोमवारीही सकाळपासूनच वाहनधारकांची नोंदणीसाठी गर्दी झाली होती. गेल्या आठवड्यात नवरात्रोत्सवात 5 तारखेपासून ते 13 तारखेपर्यंत परिवहन कार्यालयात तब्बल 1900 वाहनांची नोंदणी करण्यात आली. त्यात 1307 दुचाकींची नोंदणी झाली असून, त्यातून परिवहन विभागाला 47 लाख 17 हजार आणि 476 कारची नोंदणी होऊन 3 कोटी 40
लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे.

गतवर्षी नवरात्रोत्सव व दस-याच्या आठवड्यात 1511 दुचाकींची नोंदणी होऊन 52 लाख 75 हजार, तर 517 कारच्या नोंदणीतून 3 कोटी 66 लाख 98 हजारांचा महसूल प्राप्त झाला होता. त्यावरून गतवर्षीच्या तुलनेत महसुलात लाखोंची घट झाल्याचे दिसून येते.

‘786’साठी दीड लाख
याच आठवडाभराच्या कालावधीत नवरात्रोत्सव व दस-याचा मुहूर्तावर जवळपास 100 वाहनधारकांनी पसंती क्रमांक घेतले आहेत. त्यातूनही परिवहन विभागाला 9 लाख 10 हजारांचा महसूल प्राप्त झाला आहे. यामध्ये चारचाकी वाहनांसाठी 786 क्रमांकासाठी सर्वाधिक दीड लाख रुपये मोजण्यात आले.

आठवडाभर राहणार गर्दी
नवरात्रोत्सव आणि दस-याच्या मुहूर्तावर नव्या वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे दस-यानंतरही किमान आठवडाभर नवीन वाहनांची नोंदणी सुरू राहते. त्यामुळे यंदाही आणखी काही दिवस नोंदणीची प्रक्रिया सुरू राहणार आहे. गेल्या आठवडाभरात वाहन नोंदणीच्या प्रक्रियेतून सुमारे 4 कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे.
जयंत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी