आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्कर भरतीत चेंगराचेंगरी, गर्दीवर न‍ियंत्रणासाठी लाठीमार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - लष्करातील प्रादेशिक सेनेच्या टीए 116 पॅरा बटालियन भरतीसाठी खच्चून गर्दी झाल्याने मंगळवारी देवळाली कॅम्प येथील संपूर्ण नियोजनच कोलमडले. गदारोळ, पळापळीत उमेदवार एकमेकांवर पडल्याने झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक तरुण किरकोळ जखमी झाले. गर्दी नियंत्रणासाठी लष्करी जवानांनी उमेदवारांवर लाठीमार करण्यात आला.


देवळालीच्या टीए मैदानावर मंगळवारी जवान, लिपिक, हाऊस किपर, ब्लॅक स्मिथ पदाच्या भरतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी महाराष्‍ट्रासह आंध्र, गुजरात, केरळ, तामिळनाडू, राजस्थान, कर्नाटक, गोवा, लक्षद्वीप, दमन, पॉँडेचरीतून सुमारे 25 हजार तरुण जमले होते. मंगळवारी पहाटे तीन वाजेपासून सेंट पॅट्रिक चर्चसमोरील चौकात उमेदवारांना थांबविण्यात आले होते. नंतर पाच वाजता रांगेत टीए मैदानावर सोडण्यात आले. आधी पोहोचण्याच्या प्रयत्नात पळापळ होऊन उमेदवार एकमेकांवर पडले व चेंगराचेंगरी होऊन अनेक जण जखमी झाले. गर्दी नियंत्रणासाठी उमेदवारांवर जवानांनी लाठीमार केला. त्यामुळे पळापळ अधिकच वाढली. गर्दीचा ताण वाढल्याने चर्चची व एमएस ऑफिसची वॉल कंपाऊंडही कोसळली.


ढिसाळ नियोजन
दरवर्षी भरतीचा अनुभव असताना लष्करासह जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका उमेदवारांना बसला. चाचणीसाठी तासन्तास ताटकळत बसावे लागल्याने अनेक उमेदवारांना दिवसभर काहीच खायला मिळाले नाही. पाणी, प्रात:विधीसह प्राथमिक गरजांची सोय नव्हती. झोपण्यास, थांबण्यास जागा नसल्याने उमेदवारांनी रेल्वेस्थानक, बसस्थानक, फुटपाथ, दुकानांच्या पाय-या तसेच जागा दिसेल तिथे आसरा घेतला होता. माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांनी व रिक्षा युनियनने त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली.


रेल्वेने तरुणाला चिरडले
लष्कर भरतीसाठी आलेला बुद्धभूषण सिद्धार्थ पातोडे (20, रा. वाशीम) याचा दुरांतो एक्स्प्रेसखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी देवळालीत आल्यानंतर राहण्याची व्यवस्था नसल्याने त्याने रात्री रेल्वेस्थानकावर मुक्काम केला होता. मंगळवारी पहाटे प्रात:विधीसाठी रेल्वे लाइन ओलांडत असताना मुंबईकडे जाणा-या एक्स्प्रेसखाली सापडून जागीच ठार झाला.