आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासादयक : अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना यंदापासून शुल्कमाफी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात नूतन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना यंदापासून शुल्कमाफी लागू करण्यात आलेली आहे. त्यासाठी केवळ संबंधित विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय विभागाचे ऑनलाइन अर्ज भरून मगच प्रवेश घेणे आवश्यक असल्याचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी सांगितले.

पारंपरिक स्वरूपाच्या अन्य विद्यापीठांमध्ये ही सुविधा उपलब्ध होती. मात्र, मुक्त विद्यापीठात आतापर्यंत तांत्रिक कारणांमुळे अडकून पडलेली ही शुल्कमाफी येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू केली जाणार आहे. अर्थात, त्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून सर्व बाबींची पूर्तता केल्यानंतरच ही शुल्कमाफी लागू होणार असून, तसे झाल्यास संबंधितांकडून शुल्क आकारणी केली जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पुस्तके घरपोच
येत्याशैक्षणिक वर्षापासून मुक्त विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सप्टेंबरपूर्वी पुस्तके घरपोच मिळणार आहेत. त्यासाठीची पूर्वतयारी आतापासूनच सुरू करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना पुस्तके घेता ऑनलाइन शिक्षण घ्यायचे आहे किंवा त्याच अभ्यासक्रमाची कुणीतरी वापरलेली पुस्तकेच संबंधित विद्यार्थी वापरणार असेल, तर त्याला पुस्तकाचे शुल्कदेखील आकारले जाणार नसल्याचे कुलगुरूंनी नमूद केले आहे.

किमान एक अभ्यासक्रम मोबाइलवर
येत्याशैक्षणिक वर्षापासून मुक्त विद्यापीठातील किमान एक अभ्यासक्रम मोबाइलवर सुरू करण्याचा मानस आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही पुस्तकांविना शिकणे शक्य होणार असल्याचेही कुलगुरूंनी सांगितले. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडित अभ्यासक्रम यंदाच्या वर्षी मोबाइलवर प्रारंभी सुरू करून नंतर अन्य काही अभ्यासक्रमदेखील त्याच धर्तीवर सुरू करण्यात येणार असल्याचेही कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी सांगितले.