आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोपाळकृष्ण गोखले स्मृतिदिन विशेष : गोखले हिंदू-मुस्लिम ऐक्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नामदार गोपाळकृष्ण गोखले यांचा आज (दि. १९) स्मृतिदिन. सन १९१५ मध्ये त्यांचे निधन झाले. २०१५ हे त्यांचे स्मृती शताब्दी वर्ष यानिमित्त...

हिंदू -मुस्लिम ऐक्याची आदर्श प्रतिमा फक्त १८८७च्या क्रांती युद्धातच दिसून आली. त्यात हिंदू मुस्लिम दोन्ही राजे -रजवाडे सैनिक ब्रिटिशांच्या विरुद्ध लढले. ब्रिटिश फौज लहान असली तरी त्यांच्याजवळ अधिक मारगिरी करणाऱ्या बंदुका तोफा होत्या. त्यांच्याजवळ संदेशवाहक यंत्रणा होती. त्या यंत्रणेद्वारा भारतीय सैनिकांचे स्थान त्यांना सहज कळत असे त्याप्रमाणे आपल्या फौजांची हालचाल करून भारतीय फौजांवर हल्ला करणे त्यांचा पराभव करणे त्यांना शक्य झाले. या ऐक्याचा बोध घेऊनच ब्रिटिशांनी फोडा झोडा नीतीचा अंगीकार केला.

याचा अनुभव न्यायमूर्ती रानडे, दादाभाई नौरोजी, फिरोज शहा मेहता, टिळक गोखले या सर्वांनाच आला. अखिल भारतीय काँग्रेसचे गो खले चिटणीस असताना काँग्रेसच्या चळवळीत मुसलमानांची संख्या कमी जाणवत होती. गोखल्यांजवळ धार्मिक कडवेपणा पूर्वग्रह यांचा लवलेशही नव्हता, म्हणून ते मुसलमान पुढाऱ्यांजवळ मोकळेपणाने बोलत असत. त्यांच्या ‘सर्वधर्मसमभाव’ या विचारसरणीमुळे मुसलमान आकर्षित झाले. त्यांच्या सभांना मुसलमान सुशिक्षित तरुण मोठ्या संख्येने हजर असत.

अलिगड येथे गोखले भाषणासाठी गेले असता, त्यावेळी मुसलमान तरुणांनी अलिगड स्टेशनवरच त्यांचे स्वागत केले. त्यांना आणण्यासाठी जी घोडागाडी आली होती, त्या गाडीचे घोडे त्यांनी काढले, गाडीत गोखल्यांना बसविले स्वत: त्यांची गाडी ओढत ओढत सभास्थानी आणली ‘गोखले जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या. गोखल्यांचे हृदय अशा सन्मानामुळे उचंबळून आले. ते म्हणाले ‘तरुण मुसलमानांचा माझ्या हिंदुस्थानविषयीचा जिव्हाळा विलक्षण आहे. त्यांचा उत्साह उचंबळून येत आहे, असे मला जाणवले’. हिंदुस्थानला आता थोड्याच दिवसांत स्वराज्याचे अधिकार प्राप्त होतील, याबाबत माझ्या मनात शंका उरली नाही, असे आपले मत त्यांनी भाषणात मांडले. देशाच्या विकासाच्या दृष्टीने विचार केला तर हिंदुस्थानात सर्व जाती, जमाती धर्म मिळून हिंदुस्थान हा एकसंघ झाला पाहिजे. हीच त्यांची मनोकामना होती.
गोखल्यांच्या या विचारसरणीला आगाखान यांचा पाठिंबा होता. त्यांनी गोखले यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, प्रत्येक विचारी साध्या हिंदी मुसलमानाने ज्या प्रकारची ध्येय धोरणे डोळ्यासमोर ठेवून कार्य करावे, तशाच स्वरूपाची ध्येय धोरणे तुम्ही बाळगली आहेत आणि तोच तुमचा स्वधर्म होय. लखनौ मुक्कामी संयुक्त प्रांताचे सर्वात मोठे जमीनदार महमुदाबादचे राजेसाहेब यांनी गोखल्यांचा सत्कार केला मोठी मेजवानी त्यांच्या सन्मानार्थ दिली. लखनौच्या गोखल्यांच्या सार्वजनिक सभेचे तेच अध्यक्ष होते. लाहोर येथे मुस्लिम लीग या संस्थेने ‘हिंदू मुस्लिम समस्या’ या विषयावर भाषण करण्यासाठी गोखल्यांना निमंत्रित केले. मुसलमान समाजाने केलेला गौरव हा त्यांच्या सन्मानातील सर्वात मोठा महत्त्वाचा सन्मान होता.

आपल्या भाषणात ते म्हणाले, हिंदू-मुस्लिम ही समस्या देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने इतर प्रश्नांपेक्षा अधिक महत्त्वाची आहे. ही समस्या समाधानकारकपणे सोडवायची असेल तर समयसूचकता, धीर सारासार विवेक या गुणांची गरज आहे. निर्विकार, निरपेक्षवादी पूर्वग्रहविरहित मनाने या प्रश्नांची आज मी चिकित्सा करणार आहे आणि या वृत्तीने तुम्ही माझे भाषण ऐकाल अशी माझी आशा आहे. हिंदू मुसलमान या दोन्ही जमातींचे संबंध सलोख्याचे नाहीत, हे मला मान्य आहे. पण या दोन जमातीतील तणावाचाच फायदा ब्रिटिशांनी घेतला आपले राज्य स्थापन केले.
आज या दोन्ही जमाती देशांत शांततेने नांदत आहेत. पण, दक्षिण आफ्रिकेत हिंदू मुसलमान या दोघांवरही ब्रिटिश अत्याचार करीत आहेत. हिंदुस्थानात या दोन्ही जमाती एकोप्याने सलोख्याने नांदल्या पाहिजेत, ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. बहुसंख्य हिंदूंनी अल्पसंख्य मुसलमानांच्या मनातील भीती दूर केली पाहिजे हे हिंदूंचे कर्तव्य आहे. हिंदू मुसलमानांनी या देशाची सेवा करण्याचे व्रत अंगिकारले पाहिजे. हिंदुस्थान ही आम्हा दोन्हीही जमातींची मातृभूमी आहे. ही गोष्ट मुसलमानांनी स्वीकारली पाहिजे. म्हणजेच फोडा झोडा या ब्रिटिश नीतीला पायबंद बसेल.

‘भारत सेवक समाज’ या संस्थेची स्थापना गोखल्यांनी केली त्यावेळी आगाखान यांनी या संस्थेला देणगी दिली. या संस्थेचे सदस्यत्व मिळावे म्हणून बॅरिस्टर जीना गोखल्यांकडे गेले. पण, गोखल्यांनी त्यांना प्रथम या संस्थेची घटना नियमावली वाचण्याचा सल्ला दिला. हे सर्व वाचून बॅरिस्टर जीना त्यांच्याकडे गेले त्यांनी आपली असमर्थता प्रकट केली. पण, आपणाला प्रतिगोखले व्हायचे आहे अशा आशीर्वादाची गोखल्यांकडे मागणी केली. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा प्रश्न आजही सुटलेला नाही. पण, वरील विवेचनावरून गोखल्यांनी मात्र या समस्यांवर तोडगा दिला आपल्या कार्यकालात हिंदू-मुस्लिम ऐक्य साध्य केले, असा निष्कर्ष काढणे योग्य ठरेल.

लेखक प्रा. श्री. बा. पंडित, अध्यक्ष,गोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिक