आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन भेटीतच त्याने जिंकले होते नाशिक..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - म्हणतात, बटूने तीन पावलात अवघे विश्व व्यापले होते. पुराणातील वांगी पुराणात ठेवली तरी तीच गोष्ट सचिनबाबत नक्कीच खरी आहे. कारण नाशिकलादेखील त्याने तीन भेटीतच जिंकले होते. 20 वर्षांपूर्वी आलेल्या सचिनची फलंदाजीतील फटकेबाजी आणि गतवर्षी एका प्रकट मुलाखतीत त्याने केलेली उत्तुंग शाब्दिक टोलेबाजी नाशिककरांनी मनाच्या कोपर्‍यात एखाद्या मोरपिसासारखी कायमच जपून ठेवली आहे.

सचिन सात-आठ वर्षांचा असताना 1979-80 मध्ये त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी म्हणून पहिल्यांदा नाशिकला आल्याची आठवण सचिनने गतवर्षीच्या नाशिक भेटीत सांगितली होती. त्यानंतर 1993 मध्ये डबलविकेट टुर्नामेंटमध्ये खेळण्यासाठी आलेल्या सचिन-कांबळी या जोडीने तर धमाल उडवून दिली होती. छत्रपती शिवाजी स्टेडियमवर रंगलेल्या त्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सचिनने तुफानी फटकेबाजी करीत शतकी खेळीसह टुर्नामेंट जिंकली होती, तर तिसर्‍यांदा सचिन आला तो ‘एका’ गृहनिर्माण प्रकल्पाच्या शुभारंभाप्रसंगी. त्यावेळी त्याची केवळ एक झलक पाहण्यासाठी नागरिकांनी केलेली तुफान गर्दी आणि सचिन, सचिन,सचिनचा जल्लोष तर आजही उपस्थित सचिनप्रेमींच्या मनात ताजा आहे. तिथे रंगलेली प्रकट मुलाखत ही नाशिककरांच्या दृष्टीने मैदानावर असलेल्या सचिनच्या काळातील पहिली आणि अखेरची मुलाखत ठरली असली तरी ती अत्तराची कुपी प्रत्येक सचिनप्रेमीने आजही मनात कायम ठेवली आहे. या मुलाखतीत सचिनने उलगडलेल्या पुढील आठवणी आजही नाशिककरांच्या मनात ताज्या आहेत.

शिक्षा म्हणून क्रिकेट कॅम्प
‘साहित्य सहवास’मध्ये राहात असताना मी अत्यंत ‘डिफिकल्ट’ स्वरूपाचा मुलगा होतो. कुणाच्या टायरची हवा काढणे, कुणाच्याही घराची बाहेरून कडी लावणे, खिडकीच्या काचा फोडणे अशा प्रकारच्या खोड्या आणि मस्ती ही माझी नेहमीची कामे होती. मी आणि माझा मित्र एकाच्या अंगणातील कैर्‍या तोडताना पकडले गेलो, त्यामुळे आणखी मस्ती करायची असेल तर ती शिवाजी पार्कवर कर, म्हणून मला प्रथम शिवाजी पार्कच्या 50 दिवसांच्या कॅम्पला पाठवले गेल्याचेही सचिनने गतवर्षीच्या नाशिक भेटीत नमूद केले होते.

करिअरबाबतचा निर्णय अजितचा
जॉन मेकॅन्रो हा माझा फेव्हरीट टेनिसपटू होता. मी त्याचा इतका फॅन होतो की, त्याच्यासारखा हेअरबॅँड लावून फिरायचो, मला कुणीतरी मेकॅन्रो म्हणावे, अशी माझी इच्छा असायची. एका वयापर्यंत मी क्रिकेट आणि टेनिस हे दोन्ही खेळ सारखेच खेळायचो. मात्र, एका टप्प्यावर जेव्हा करिअरसाठी एकच खेळ खेळायचा असा निर्णय घेण्याची वेळ आली, तेव्हा अजितने (मोठय़ा भावाने) माझ्यासाठी क्रिकेटची निवड केली.

..तर सारं काही शक्य
तुमच्याकडे जिगर असली तर सारं काही शक्य असतं. तुमच्या मनात भारतासाठी खेळायची भूक असेल तर तुम्हाला काहीच अशक्य नाही. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना हे सतत लक्षात ठेवा की, स्वप्न तेव्हाच खरी होतात, जेव्हा तुम्ही स्वप्नातून जागे होऊन त्याचा पाठपुरावा करता.

एकही दिवस वाया घालवला नाही म्हणून
गुरू हा आपल्याला नेहमी योग्य गायडन्स देत असतो. आचरेकर सर माझ्या सरावाबाबत खूप आग्रही होते. मी सरांकडे चार वर्षे सराव करायचो, त्या दिवसांमध्ये एखादा दिवसही माझा सराव चुकू नये यावर त्यांचा कटाक्ष असायचा. मी जितका काळ प्रॅक्टिस केली त्यापैकी किमान 30-35 दिवस तरी मला असे वाटले असेल की, आज नको सराव करायला. एक दिवस नाही केला तर काय फरक पडतो. त्यावेळी असे वाटायचे की, आज पिक्चर पाहावा किंवा टाईमपास करावा, पण सरांनी मला तसे करण्याची कधीच मुभा दिली नाही. आता इतक्या वर्षांनी मागे वळून पाहताना असं जाणवतं की, ते माझ्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचे दिवस होते. ते 35 च काय एकही दिवस वाया घालवला नाही, ते खरोखरच चांगले झाले. कारण त्या दिवसांनीच मला खर्‍या अर्थाने घडविले. त्यामुळेच मी देवासमोर हात जोडून नेहमी म्हणतो की, देवा मलाच नव्हे सगळ्यांनाच असे प्रशिक्षक मिळू देत.