आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त स्वच्छतेच्या ठेक्यावरून स्थायीचे सदस्य अाक्रमक; प्रशासनाला सडेताेड उत्तर देण्याची तयारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- साधुग्राममधील स्वच्छतेच्या ठेक्याचा वाद उच्च न्यायालयात पाेहोचला असताना स्थायी समितीच्या सदस्यांना काेंडीत पकडण्याची प्रशासनाकडून खेळली जाणारी चाल बघून अाता वादग्रस्त ठेकेदाराकडील ९५ लाखांची वसुली महापालिकेने का केली नाही वा लेखापरीक्षण अहवाल असताना प्रशासनाने अर्थातच, अायुक्तांनी त्यावर त्यांचे स्पष्टीकरण किंबहुना लेखापरीक्षकांकडे अाक्षेपांबाबत अनुपालन का केले नाही, याचा जाब विचारण्याची तयारी सुरू झाली अाहे. जेणेकरून प्रशासनाकडून ठेकेदाराची वादग्रस्त पार्श्वभूमी दडवून ठेवण्यामागे वा संबंधित ठेकेदार निर्दाेष असेल, तर त्या अनुषंगाने कारवाई का झाली नाही, याबाबत घेरण्याची रणनीती सदस्यांनी अाखली अाहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधुग्रामच्या स्वच्छतेचा ठेका ३५ टक्के जादा दराने ‘वाॅटरग्रेस प्राॅडक्ट्स’ यांना देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळून लावला हाेता. त्यामागे संबंधित कंपनीकडे महापालिकेची ९५ लाख रुपयांची थकबाकी असल्याचे कारण दिले हाेते. पुढे सर्वात कमी दराची निविदा असूनही प्रस्ताव फेटाळल्यामुळे वाॅटरग्रेसने न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, उच्च न्यायालयात महापालिकेने ठाेस बाजू मांडून ठेकेदाराच्या वादग्रस्त पार्श्वभूमीबाबत न्यायालयाला अवगत करण्याच्या सूचना स्थायी समिती सदस्यांनी केल्या हाेत्या. त्यानुसार अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी स्थायी समिती सदस्यांची भूमिका पत्राद्वारे घेऊन न्यायालयात सादर करण्याची तयारीही दाखवली हाेती. त्याचप्रमाणे वकिलांबाबत संशय असेल, तर पॅनलमधील याेग्य वकिलाचे नाव सुचवल्यास अावश्यक बदलही करण्याचे अाश्वासन िदले हाेते. अायुक्तांच्या पवित्र्यामुळे प्रशासनाची पारदर्शकता सिद्ध हाेत असली, तरी भविष्यात निकाल विराेधात गेल्यास त्याचे बालंट स्थायीवर नकाे म्हणून सदस्यांनी व्यूहरचना केली अाहे. त्यासाठी अायुक्तांना लेखी पत्र पाठवून काही प्रश्नांची उत्तरेही सदस्य मागवत अाहेत. त्यात २००९ मध्ये लेखापरीक्षणाचा अाक्षेप असताना त्याचे अनुपालन प्रशासनाने का केले नाही, तसेच ठेका द्यावा की नाही, याबाबत स्पष्टपणे मत का दिले नाही अादी माहिती मागवली जात अाहे. जेणेकरून स्थायीच्या खांद्यावर बंदूक ठेवून ठेका देण्याची प्रशासनाची खेळी अयशस्वी हाेईल, असा सदस्यांचा युक्तिवाद अाहे.

येत्या मंगळवारी हाेणार सुनावणी
उच्चन्यायालयात साधुग्रामच्या स्वच्छतेच्या ठेक्यासंदर्भात मंगळवारी सुनावणी झाली. महापालिका विरुद्ध वाॅटरग्रेस अशा वादात दुसऱ्या क्रमांकावरील निविदाधारक कंपनी क्रिस्टिलने उडी घेतल्यामुळे अाता पुन्हा याेग्य ती कागदपत्रे सादर करण्यासाठी महापालिकेने येत्या मंगळवार (दि. २१)पर्यंतचा अाठ िदवसांचा अवधी मागून घेतल्याचे अाराेग्य विभागातील सूत्रांनी सांगितले. या अाठ दिवसांत हाेणाऱ्या अभ्यासाअंती काेण कसा युक्तिवाद करते यावर ठेक्याचे भवितव्य अवलंबून असेल.

साधुग्रामची स्वच्छता ठप्प
ठेकेदारनिश्चितीवरून सुरू असलेला वाद न्यायप्रविष्ट झाल्यामुळे तब्बल १४ िदवसांच्या निर्धारित कालावधीतील साधुग्रामच्या स्वच्छतेचे कामकाज ठप्प झाले अाहे. जुलै ते ३० सप्टेंबर अशा ९२ दिवसांच्या कालावधीचा ठेका असून, न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे साधुग्राममध्ये स्वच्छता काेणी करायची, असाही प्रश्न अाहे. सध्या विविध अाखाड्यांचे साधू-महंत येथे दाखल हाेत असून, भाविक अन्य गर्दीमुळे कचरा साचणे सुरू झाले अाहे. त्यात अाता न्यायालयीन सुनावणी पुढील अाठवड्यापर्यंत लांबणीवर पडल्यामुळे जवळपास २० दिवसांहून अधिक कालावधीच्या स्वच्छतेचा प्रश्नही निर्माण हाेणार अाहे.