आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sadhugram Land Issue 193 Farmer Get Notice For That

साधुग्राम जागा अधिग्रहणप्रश्नी तहसीलदारांनी केली पाहणी; १९३ शेतकऱ्यांना उद्यापर्यंत नोटिसा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - साधुग्रामचे अधिग्रहण न्यायालयाने बेकायदा ठरविल्यानंतर जागा अधिग्रहणासाठी तहसीलदारांनी शनिवारी (दि. ३) तपोवनातील जागेची पाहणी केली. सोमवार(दि. ५)पर्यंत १९३ शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात येणार असून, पुढील सात दिवसांत त्यांचे म्हणणे जाणून घेतले जाईल.
उपजिल्हाधिकाऱ्यांना जागा अधिग्रहणाचे अधिकारच नसल्याचा मुद्दा हेरत न्यायालयाने साधुग्रामचे अधिग्रहण बेकायदा ठरविले. ही जबाबदारी तहसीलदार किंवा प्रांतांची असल्याचे स्पष्ट केल्याने आता जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडून परवानगी घेत तहसीलदारांमार्फत जागा अधिग्रहणाच्या प्रक्रियेस पुन्हा नव्याने सुरुवात केली आहे. त्यानुसार १९३ शेतकऱ्यांना सोमवारपर्यंत नोटिसाही देत त्यांचा खुलासा घेतला जाईल. सात दिवसांची ही प्रक्रिया असल्याने त्यानंतरच प्रत्यक्षात अधिग्रहण होईल.
परंतु, जमीन देण्यास तयार असलेल्या शेतकऱ्यांना मात्र सात दिवस थांबण्याची गरज नसून, त्यांच्या जमिनी तत्काळ घेतल्या जातील. शिवाय, या जमिनी भाडेतत्त्वावरच घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दराबाबत कल्पना दिली जाईल. एकरीसाठी देण्यात येणाऱ्या दराबाबत शेतकरी तयार झाल्यास लागलीच त्यांची जमीन ताब्यात घेत त्यावर विकासकामे सुरू केली जातील.

अधिग्रहणापासून मिळणार भाडे
शेतकऱ्यांच्या जमिनी जेव्हा प्रशासनाच्या ताब्यात घेतल्या जातील, तेव्हापासूनच भाडे किंवा मोबदला दिला जाईल. त्यामुळे प्रक्रियेला विलंब होईल तेवढे कमी कालावधीचे भाडे शेतकऱ्यांना मिळणार आहे. प्रक्रिया जानेवारीनंतर पूर्ण झाल्यास फेब्रुवारी ते नोव्हेंबर म्हणजे महिन्यांचेच भाडे मिळेल. यातून शेतकऱ्यांचा तोटा, तर शासनाचा फायदा होणार असल्याचेही बोलले जात आहे.