श्रावणाची चाहूल लागताच सण-वारांची चाहूल लागताच महिलांना आठवण होते ती मंगळागौरीची.. महिलांच्या तसे खास जिव्हाळ्याचा हा क्षण. म्हणजे या निमित्ताने का होईना माहेरी जायला मिळते. चार मैत्रिणी भेटतात, गप्पा-टप्पा आणि लाडही होतात. मुलगी सासरी थोडी रुळली की तिच्या हाताने तिचं सौभाग्य अबाधित राहावं म्हणून शंकर- पार्वतीची पूजा केली जाते, ही पूजा म्हणजे मंगळागौर! या मंगळागौरीचं व्रत पाच वर्षाचं असतं, त्यानंतर सवडीने ती उजवायची असते.
आजकालच्या फास्ट फॉरवर्ड जमान्यात हे पारंपरिक व्रत-उत्सव, खेळ तसे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पण, आपली संस्कृती, सांस्कृतिक वारसा जतन करता यावा म्हणून या खेळांचे जतन काही महिला मंडळे करतात. पूर्वी मंगळागौरीच्या निमित्ताने घरात जागरण व्हायचं, रात्रभर गाणी आणि विविध खेळांनी हा दिवस साजरा केला जायचा. काळानुरूप याचे स्वरूप बदलून आता फक्त काही तासांचे पण परिपूर्ण असे कार्यक्रम घेतले जातात. मंगळागौरीचे खेळ हे घरातल्या वस्तूंचा खेळ असतात, म्हणजे सूप म्हणा किंवा जातं म्हणा अशा दररोज वापरल्या जाणार्या वस्तू इथं वापरल्या जातात. हल्ली मंगळागौरीचे खेळ करणारे ग्रुप्स आपला हा सांस्कृतिक वसा जपण्यासाठी कार्यरत आहेत. पूर्वी हे खेळ महिलांचे आरोग्य राखण्यासाठी होते, आता काहीशा व्यावसायिक रूपांतरणामुळे फक्त मनोरंजनाचा भाग तेवढा शिल्लक आहे.
हे खेळ पूर्वी आजीकडून आईकडे आणि आईकडून मुली शिकायच्या. आता या खेळांचे सादरीकरण करणारी मंडळे आहेत. ज्या बाईची पहिलीच मंगळागौर असते, तिच्या माहेरी किंवा सासरी हे खेळ घेतले जातात. यामध्ये सुमारे 25 ते 30 स्त्रियांचा सहभाग असतो. अशा व्यावसायिक पातळीवर होणार्या खेळांमध्ये पाहायला गेल्यास जवळजवळ 60 मंगळागौरीचे खेळ खेळले जातात. ज्यांना पूर्णत: पारंपरिक स्वरूप असते. त्यात फुगडीमध्ये बस फुगडी, गवळण, सलाम फुगडी, फुलपाखरू, एका हाताची फुगडी असे पारंपरिक प्रकार तर इन्होवेटिव्ह प्रकारची फुगडी म्हणता येईल असा स्टंट फुगडी हाही प्रकार असतो. तसंच पिंगा, जोगवा, दिंडी, गाठोडं, झिम्मा असे खेळसुद्धा खेळले जातात. या खेळांचं सध्याचं स्वरूप आणि पूर्वीचं स्वरूप यात जमीन आसमानचा फरक जाणवतो, पहिली मंगळागौर आणि चिरतरुण सौभाग्याची सांगड घालण्याची प्रार्थना या वेळी नव-वधू ‘शंकर- पार्वती’कडे करतात