नाशिक - शालेय बसची व अन्य थकीत फी न भरल्याबद्दल चिमुरड्यांना वर्गात डांबून ठेवल्याचा आरोप करीत संतप्त पालकांनी व्यवस्थापनाला जाब विचारल्याने सेंट फ्रान्सिस शाळेत मंगळवारी दिवसभर तणाव निर्माण झाला होता. एका पालकास मुख्याध्यापिकेसह तिच्या पतीने मारहाण केल्याच्या तक्रारीनंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार समजताच दोन आमदार, नगरसेविका आदींसह अन्य काही पालकही शाळेत आले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत पालकांची समजूत काढली.
पालकांच्या तक्रारीनुसार, नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी सीनिअर व ज्युनिअर केजीच्या विद्यार्थ्यांना शालेय बसमधून नेण्यात आले. मात्र, त्यांना वर्गात बसू न देता अन्य एका वर्गखोलीत कोंडून ठेवण्यात आले. ‘पालक फी भरत नाहीत तोपर्यंत तुम्हाला घरी सोडणार नाही’, असा दम देण्यात आला. त्यानंतर शाळेतील कर्मचाऱ्यांनी पालकांना ‘फी भरा आणि
पाल्यांना घेऊन जा’ असे फोनद्वारे कळवले. हा प्रकार कळल्याने पालकांचा संताप झाला व त्यांनी शाळेत धाव घेतली. फी लगेच भरण्यास नकार देत त्यांनी व्यवस्थापनाशी वाद घातला. फीवाढीच्या विरोधात लढा सुरू असताना शाळेने दंडेलशाही करत मुलांना डांबून ठेवून कायदा हातात घेतल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे व नगरसेविका सुजाता डेरे यांनीही शाळेत जाऊन व्यवस्थापनाला जाब विचारला. मात्र, व्यवस्थापन ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने पालकांसह आमदारांनी तेथेच ठिय्या आंदोलन सुरू केले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन देत मुख्याध्यापिका कुसुमा शेट्टी व
त्यांचे पती चंद्रशेखर शेट्टी यांनी ताब्यात घेतले. काही पालक शेट्टींवर धावून गेले असता वरिष्ठ निरीक्षक हेमंत सोमवंशी यांनी त्यांची समजूत काढली. या प्रकरणी शेट्टी दांपत्याच्या विरोधात लहान मुलांना डांबून ठेवत त्यांचा छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली.
आदेशाची पायमल्ली
फीवाढीच्या विरोधात कायदेशीर आंदोलन सुरू आहे. मुलांना फीसाठी डांबून ठेवल्याने पालकांचा संयम सुटला. शिक्षण अधिकारी, न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली शाळेकडून होत आहे.
संजय पाटील, पालक ,सदस्य शिक्षण बाजारीकरणविरोधी मंच शिक्षकांकडून खंडन
विद्यार्थ्यांना डांबून ठेवत फी वसूल करण्याच्या आरोपांचे शाळेतील शिक्षकांनी मात्र खंडन केले. फीवाढीविरोधात आंदोलन सुरू आहे. त्यामुळे हेतुपुरस्सर असे वाद केले जातात, असा शिक्षकांचा आरोप आहे.
पालकांना धक्काबुक्की
शाळा व्यवस्थापनाच्या दादागिरीला आळा घालण्याएेवजी घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी आम्हालाच धक्काबुक्की केल्याचा आरोप पालकांनी केला. तर वेळीच हस्तक्षेप केला केला नसता तर वाद आणखी चिघळला असता, असे पोलिसांनी सांगितले.