आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या ‘साज’चे सूर निनादणार गोव्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशिकच्या ‘साज : द सोल ऑफ म्युझिक बँड’चे सूर आता रॉक संगीताच्या कदरदान गोव्यात निनादणार आहेत. ‘चॅनल व्ही’ने मुंबईत घेतलेल्या ‘लाँच पॅड हिंदी’ स्पर्धेत निवडलेल्या तीन हिंदी रॉक बँडमध्ये या ग्रुपची निवड झाली आहे. 7 आणि 8 फेब्रुवारीला गोव्यात होणार्‍या अंतिम फेरीसाठी त्यांना संधी मिळाली आहे.

केरळमधील कोझिकोड येथील आयआयएम संस्थेने 24 जानेवारीला आयोजित केलेल्या ‘अल्टर ऑफ रॉक’ या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवडलेल्या देशातील सहा रॉक बँडमध्येही ‘साज द सोल’चा समावेश करण्यात आला आहे. पाच बँड दक्षिण भारतातील असून, नाशिकचा हा रॉक बँड महाराष्ट्र ते जम्मू काश्मीरपर्यंतच्या अध्र्या भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. केरळला जाण्यासाठी नाशिकच्या गिरीकंद ट्रॅव्हल्सतर्फे प्रवासखर्च दिला जाणार असल्याचे कुलदीप गडाख यांनी सांगितले.

नाशिकच्या या बँडची स्थापना 2005 मध्ये कुलदीप आणि सचिन कठाडे यांनी केली. केवळ दोन कलाकारांच्या जोरावर सुरू झालेला प्रवास देशभरात जाऊन पोहोचला आहे.

कुलदीप (गायन), सचिन (रिदम), तुषार जोशी (लीड गिटार), विनेश नायर (ड्रम्स) आणि शंकुल चव्हाण (बास गिटार) या सर्वांच्या अनोख्या समन्वयामुळे आगळीच रंगत निर्माण होते. या बँडने ‘रेडिओ मिर्ची’वर सादरीकरण केले आहे. त्याचबरोबर नवरात्रोत्सवात दुर्गापूजा, नाशिकरोड येथील ऋतुरंग अशा विविध कार्यक्रमांना साज चढवला आहे. कुलदीप उस्ताद गुलाम मुस्तफा खान साहेब यांचे विद्यार्थी आहेत, तर गिटारवादक सचिन गाण्याचे कंपोझिंग आणि त्याला ताल देण्याचे काम करतात. सचिन यांची ‘साज म्युझिक अकॅडमी’ ही संस्थाही संगीताचे धडे देण्याचे काम करते.

स्वत:च करतात जुळणी
या पथकाचे वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही गीताची कॉपी न करता स्वत: वेगळ्या स्वरूपाची जुळणी करून तिचे सादरीकरण करतात. स्वत:च मराठी व हिंदी गीतरचना करून त्यांना संगीत व त्याच्या जुळणीचे काम हे एक या बँडचे वेगळेपण म्हणता येईल.