आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमी चटई क्षेत्र विक्री, बांधकाम व्यावसायिकास २५ लाख दंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक महापालिकेत दाखल केलेल्या चटई क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचा विक्री करार करून बांधकाम व्यावसायिकाने वेगवेगळ्या सर्टिफिकेटद्वारे एकाच सदनिकेचे वेगवेगळे क्षेत्र नमूद करून चटई क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या सदनिका ग्राहकांना विक्री केल्याप्रकरणी ग्राहक न्याय मंचाने मुंबई येथील बांधकाम कंपनीस सुमारे २५ लाखांच्या दंडाची शिक्षा आणि सेवेतील कमतरतेपोटी प्रत्येक तक्रारदारास लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश ग्राहक न्याय मंचाने दिले.
तक्रारदार कैलास म्हेत्रे, नरेंद्र गजरे, शशिकला गजरे, दिनेश देसले, ज्योती लुणावत, पुष्पा उबाळे यांनी श्रीकृष्ण होम्स या इमारतीमध्ये सदनिका घेतल्या आहेत. ठरलेल्या व्यवहारानुसार मंजूर नकाशाप्रमाणे ग्राहकांना वेगळे चटई क्षेत्र चाैरस फुटांमध्ये विक्री करून वेगवेगळे खरेदीमूल्य घेतले आहे. सदनिका ताब्यात घेतल्यानंतर मंजूर नकाशा करारात नमूद केलेल्या क्षेत्रापेक्षा प्रत्यक्षात सदनिकेचे क्षेत्र काही चौरस फुटांमध्ये कमी असल्याचे लक्षात आले. बांधकाम व्यावसायिकाने आदेशाचे उल्लंघन करून इमारतीच्या बांधकाम परवानगी पूर्णत्वाचा दाखला मिळवला. यासह प्रत्येक ग्राहकाकडून पार्किंग शुल्क अडीच लाख रुपये घेऊन कराराचे उल्लंघन केले. यामध्येही मंजूर नकाशापेक्षा पार्किंग क्षेत्र कमी दिले आहे. इमारतीच्या सामायिक जागेमध्ये प्रवेशद्वार भिंतीचे बांधकाम नसतानाही जागा बंद करून ती जागा तळमजल्यावरील सदनिकाधारकास बेकायदेशीर विक्री केली आहे. प्रत्येक ग्राहकाकडून ७५ हजार रुपये मेंटेनन्स शुल्क घेतले. लिफ्टला बॅटरी बॅकअपकरता विद्युत जोडणीसाठी अतिरिक्त १२ हजार अधिक शुल्क आकारले. कराराप्रमाणे इमारतीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था केली नाही. ही नुकसानभरपाई मिळण्यासाठी आणि बांधकामातील दोष दूर करण्यासाठी तक्रारदारांनी बांधकाम व्यावसायिकास नोटीस पाठवली होती. नुकसानभरपाई आणि शारीरिक, मानसिक आर्थिक त्रासापोटी ग्राहक न्याय मंचाकडे तक्रार दाखल केली होती. यावर दोन्ही पक्षांचे म्हणणे एेकून घेत ग्राहक न्याय मंचाने बांधकाम व्यावसायिकास दोषी ठरवत इमारतीमधील सहा सदनिकाधारकांना २४ लाख ८२ हजार ८१९ रुपये प्रत्यक्ष हाती मिळेपावेतो १२ टक्के व्याजासह ग्राहकांना द्यावे. सेवेतील कमतरतेपोटी प्रत्येकी लाख रुपये आणि शारीरिक, मानसिक त्रासापोटी प्रत्येकी १० हजार आणि अर्जाचा खर्च प्रत्येकी हजार रुपये बांधकाम व्यावसायिकाने द्यावे, असे आदेश दिले. ग्राहक न्याय मंचाचे अध्यक्ष तथा न्यायाधीश मिलिंद सोनवणे, सदस्य प्रेरणा काळुंखे-कुलकर्णी, के. पी. जाधव यांनी हा आदेश दिला.

निकालाचे स्वागत
^ग्राहक न्यायमंचाने दिलेल्या निकालामुळे ग्राहकांची होणारी फसवणूक टळेल. बांधकाम व्यावसायिकांकडून अशाप्रकारे फसवणूक केली जात आहे. ग्राहकांनी पूर्ण करारानुसार सदनिका खरेदी करणे हा ग्राहकांचा हक्क आहे. अतिरिक्त पैसे घेणे बेकायदेशीर आहे. - कैलास म्हेत्रे, तक्रारदार