आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकामध्‍ये विक्रीकर विभागाकडून करदात्यांची पडताळणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात विक्रीकराच्या परताव्यासंबंधी केलेल्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर विभागीय विक्रीकर कार्यालयाने करदात्यांची पडताळणी सुरू केली आहे. पाच लाखांपर्यंत असलेल्या किती करदात्यांना परताव्याचा लाभ मिळू शकेल, याबाबत आढावा घेतला जात आहे. दरम्यान, सरकारच्या धोरणात निश्चित तरतुदी काय आहेत, याबाबत विभागाच्या मुख्यालयाकडून शुक्रवारपर्यंत सर्व विभागीय कार्यालयांना स्पष्ट आदेश मिळण्याची शक्यता वरिष्ठ अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.

करदात्याने भरलेल्या मूल्यवर्धित करातील परतावा मिळण्यासाठी सध्या दोन-तीन वर्षांचा कालावधी लागतो. यामुळे उद्योजक-व्यापार्‍यांच्या विविध संघटनांकडून हा करपरतावा वेळेत मिळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. ही बाब लक्षात घेता अर्थमंत्र्यांनी 5 लाखांपर्यंतच्या करदात्यांना हा परतावा 1 एप्रिल 2013 पासून पुढील वर्षात समायोजित करून मिळण्याची आशादायी घोषणा केली आहे. याचा लाभ नाशिककर करदात्यांना मिळणार आहे. विक्रीकर विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मते या प्रकारच्या करदात्यांची सर्वाधिक संख्या मुंबईत आहे. नाशिकमध्ये मात्र ही संख्या फारशी नाही. मात्र, निश्चित किती करदात्यांना हा फायदा मिळेल, याची पडताळणी सुरू आहे.

पडताळणी सुरू
अर्थसंकल्पातील तरतुदींबाबत स्पष्टतेसाठी आमच्या मुख्यालयाकडून शुक्रवारपर्यंत माहिती येणार आहे. किती करदात्यांना याचा फायदा मिळेल, याची सविस्तर माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. सुमेरकुमार काले, सहायक विक्रीकर आयुक्त, नाशिक विभाग


दिलासा महत्त्वाचा
विक्रीकर विभागाकडून व्यापार्‍यांना तीन वर्षे करपरतावा मिळत नाही. मात्र, या नव्या तरतुदीने पाच लाखांवरील करपरताव्याचे समायोजन करून मिळणार आहे. निव्वळ दंड आकारण्यापेक्षा स्वत:च्या त्रुटी ध्यानात घेत दिलासा दिला. इतकेही कमी नाही. संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉर्मस


करदात्यांचा फायदा
करपरतावा वेळेवर मिळत नसल्याने उद्योजक-व्यापार्‍यांची नाराजी होती. मात्र, नव्या तरतुदीचा फायदा करदात्यांना मिळू शकणार आहे. उद्योग जगताकडून या तरतुदींचे स्वागत करण्यात येत असले तरी, विक्रीकर विभागाची प्रक्रिया अधिक जलद होण्याची अपेक्षा आहे. मनीष कोठारी, उपाध्यक्ष, निमा