आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दसक घाटावर उभारणी ‘समांतर रामकुंडा’ची; रामकुंडावरील गर्दीच्या विकेंद्रीकरणासाठी पाऊल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - सिंहस्थ कुंभमेळ्यात शाही स्नानासाठी रामकुंडावर होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन गर्दीच्या नियोजनासाठी दसक येथे गोदावरी नदीपात्राच्या दोन्ही बाजूने घाट विस्तारीकरण करून समांतर रामकुंडाची उभारणी केली जात आहे.
रामकुंडाच्या धर्तीवर दसक येथे गोदावरी नदीवर संत जनार्दन स्वामी पूल ते दशक्रिया विधी शेडपर्यंत, तसेच नांदूरमानूर गावाच्या बाजूने जवळपास 500 मीटर घाट यापूर्वीच विकसित करण्यात आलेला आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर दसक दशक्रिया विधी शेड ते पंचक स्मशानभूमीपर्यंत व मानूरला नाल्यापासून पुढे 500 मीटर घाटाचे विस्तारीकरण सुरू झाले आहे. तत्पूर्वी पात्रात उतरण्यासाठी अस्तित्वातील घाटाला पायर्‍या व पात्रातील खडकाळ भाग तोडून तो जेसीबीच्या साहाय्याने समांतर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. विरुध्द बाजूला नदीपात्रात उतरण्यासाठी पायर्‍या तयार केल्या जाणार आहेत.

कुंभमेळ्यात पर्वणीच्या दिवशी रामकुंड भागात देशभरातील लाखो भाविकांची गर्दी होते. या गर्दीचे इतरत्र विभाजन करण्यासाठी प्रशासन दसकच्या पर्यायाचा विचार करत असून, एकाच वेळी लाखभर भाविक स्नान करू शकतील, अशी तयारी केली जात आहे.

पर्वणीच्या दिवशी भाविकांनी स्नानासाठी दसकचा पर्याय निवडल्यास होणारी गर्दी लक्षात घेऊन या भागासाठी दोन ठिकाणी वाहन पार्किंगच्या जागेची पाहणी करण्यात आली. दसक व मानूरच्या बाजूने घाटावर हायमास्ट लावले जात आहेत. सध्या दसकच्या पुलासह घाट व पात्राची पातळी, पायर्‍या बनविण्यासाठी चार जेसीबीच्या साहाय्याने काम केले जात आहे. सिंहस्थ आराखड्यात या कामासाठी सुमारे 50 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
गोदापात्राच्या दोन्ही बाजूने होतेय विस्तारीकरण
दसक येथील गोदापात्राच्या दोन्ही बाजूने घाटाचे विस्तारीकरण केले जात आहे. पात्रात उतरण्यासाठी पायर्‍या व पात्रातील खडक फोडून लेव्हल करण्यात येत आहे. शाही स्नानाच्या दिवशी लाखो भाविकांना एकाच वेळी स्नान करणे शक्य व्हावे, असा कामाचा आराखडा आहे. - अशोक सातभाई, नगरसेवक