आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समांतर रस्ता; उपाय नव्हे डोकेदुखी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सुयोग्य नियोजनाचा अभाव आणि समांतर रस्त्यांच्या बाजूला कुठेही उभी राहणारी वाहने, प्रवासी घेण्यासाठी रस्त्यांवर उभे राहणारे रिक्षाचालक, हातगाडीवाले आणि ट्रॅव्हल्सच्या बसेसनी समांतर मार्गांचा ताबा घेतला आहे. समांतर रस्ते आक्रसले गेले असून, नियमानुसार या मार्गावरील वाहतूक दुतर्फा असूनही वाहनचालकांना हे ज्ञात नसल्याने उलट मार्गाने येणार्‍या चालकाच्या अंगावर गाडी घालून त्याला कट मारण्याचे प्रकार घडत असल्याने हा समांतर रस्त्या सुरळीत वाहतुकीसाठी उपाय नसून ती डोकेदुखी ठरत आहे.

उड्डाणपुलाच्या निर्मितीनंतर वाहतूक सुरळीत होईल, अशा भ्रमात असलेल्या नाशिककरांची निराशा झाली आहे. समांतर मार्ग आक्रसल्याने उड्डाणपुलांचा उपयोग शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी झालेला नाही. त्यातच दोन्ही समांतर मार्ग दुतर्फा असल्याचे नागरिकांना ज्ञात नसल्याने विरोधी दिशेने येणार्‍या छोट्या दुचाकी, तीनचाकींची वाहतूक अस्ताव्यस्तपणे सुरू असते. त्यामुळे सातत्याने त्याच रस्त्यांचा वापर करावा लागणार्‍या लगतच्या वसाहतींमधील नागरिकांसाठी समांतर रस्त्यांवरील नित्याचा प्रवास आता जीवघेणा ठरू लागला आहे. त्यामुळे या रस्त्यावरच सातत्याने वावरावे लागणार्‍या नागरिकांनीच प्रशासनाला सुचविलेले काही उपाय.

किनारा हॉटेलच्या बाजूचा मार्ग एकेरी व्हावा
किनारा हॉटेलच्या बाजूने नागरिक येऊन मुंबई नाका सर्कलकडे उलट दिशेने जात असून, हा प्रकार अत्यंत धोकादायक, तसेच वाहतुकीला अडथळा ठरणारा आहे. त्यामुळे महामार्गावरून येणार्‍या नागरिकांना केवळ किनारा हॉटेलच्या बाजूने आत जाण्यास परवानगी असावी. बाहेर येऊ इच्छिणार्‍या प्रत्येक वाहनाने भाभानगरमार्गेच यावे, यासाठी कायद्याचा बडगाच उगारला जाण्याची गरज आहे. रामनाथ झगडे, नागरिक

अनधिकृत वाहतूक थांबे त्वरित हटवावेत
समांतर रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात असलेले अवैध वाहतूक थांबे हटविल्यास निम्मी समस्या संपणार आहे. समांतर रस्त्यांवर रिक्षाचालक, बाहेरील वाहनांकडून केली जाणारी प्रवासीभरती आणि चायनीज, अंडा-भुर्जीच्या गाड्या असतात. शिवाय, प्रवासी गाडीत बसविणे-उतरविणे हे देखील रस्त्यातच सुरू असते. हे बंद केल्यास तसाच अनधिकृत पार्किंग उठविल्यास वाहतूक समस्याच कायमची निकाली निघणार आहे. व्ही. ए. पावरा, नागरिक

सकाळी, संध्याकाळ प्रचंड गर्दी
सकाळी 9.30 ते 10.30 आणि सायंकाळी 6 ते 7 या वेळेत ऑफिस, शाळा, महाविद्यालये सुटत असल्याने इंदिरानगर क्रॉसिंगपाशी प्रचंड गर्दी असते. त्यामुळे हा रस्ता मोठा रहदारीचा असल्याने या भागात उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यामुळे या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अंडरपास किंवा समान रस्त्यांवर दोन ओव्हरब्रिज बांधल्यास काही कायमस्वरूपी तोडगा निघू शकेल. आर. टी. मोरे, शहर वाहतूक पोलिस

फलक हटवण्याची थातूरमातूर कारवाई
महामार्ग आणि समांतर रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याऐवजी महापालिका अतिक्रमण विभाग आणि महामार्ग प्राधिकरणच्या वतीने पाथर्डी फाट्यानजीक फ्लायओव्हरखाली लावण्यात आलेल्या फलकांना हटवण्याची थातूरमातूर कामगिरी झाली. खरेतर या ठिकाणीची अतिक्रमणे काढायला हवी होती. मात्र फलक हटवून हे पथक अन्य कोणतीही अतिक्रमणे न काढता निघूनही गेल्याने ही दिखाऊ कारवाई कशासाठी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

गरवारे ते आडगाव नाका दोन्ही रस्ते दुहेरी
महामार्गानजीकच्या समांतर रस्त्यांबाबत संभ्रमाची स्थिती कायम असल्याने बाळासाहेब कुरुप यांनी महामार्ग प्राधिकरणाकडे त्यासंदर्भात माहितीच्या अधिकारात विचारणा केली. गरवारे ते आडगाव नाका हा संपूर्ण रस्ता दुतर्फा आहे, असे उत्तर त्यांना देण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात भुजबळ फार्मजवळील रस्त्याने मुंबई नाका येथे जाणार्‍या वाहनचालकांना हा रस्ता एकतर्फी वाटून ते द्वारकाकडून येणार्‍या वाहनचालकांच्या अंगावर वाहन घालणे, तर पलीकडच्या समांतर रस्त्यावर त्यासारखीच परिस्थिती दुसर्‍या बाजूकडून येणार्‍या रस्त्यांवरील वाहनचालकांवर येत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे.