आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Samir Bhujbal Member Of The 15th Lok Sabha Representing Nashik

पुन्हा दिल्लीसाठी समीर यांची ‘विकासवारी’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिक लोकसभा मतदारसंघातून आगामी निवडणूक पालकमंत्री छगन भुजबळ की विद्यमान खासदार समीर भुजबळ लढविणार, ही उत्सुकता कायम असतानाच, गेल्या पाच वर्षांतील समीर यांच्या विकासकामांचा लेखाजोखा मांडणार्‍या ‘विकासवारी’ या पुस्तिकेचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 24) नाशकात होणार असल्याने समीर यांचेच हे प्रोजेक्शन असल्याचे संकेत आहेत.

नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ हे दिल्लीकडे कूच करतील, असे चित्र मध्यंतरी होते. खुद्द शरद पवार यांनीही नाशिकमधील उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी येवल्याचा बारामतीपेक्षाही चांगला विकास झाल्याचे सांगत आता शेजारी पाहा, असा अंगुलिनिर्देश भुजबळांना केला होता. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही भुजबळांच्या वक्तव्यानंतर त्यांचे हे शेवटचे अधिवेशन असून, ते लोकसभा लढविणार असल्याचे वृत्त पसरले होते. मात्र, त्यानंतर लगोलग तिसर्‍याच दिवशी मीडियाने बोलण्याचा विपर्यास केल्याचे सांगत ‘समीर’ मला त्याची जागा कशी देईल, असा सवालही त्यांनीच उपस्थित केला. परिणामी, नेमका उमेदवार कोण? या संभ्रमात भरच पडली. त्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मंगळवारी राष्ट्रवादीच्या हायटेक कार्यालयाचे उद्घाटन व जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यानिमित्त शरद पवार येत असून, लोकसभेसाठी नाशकातील उमेदवारीचे स्पष्ट संकेतही त्यानिमित्ताने मिळण्याची अपेक्षा आहे. त्याचदृष्टीने खासदार समीर भुजबळ यांचे ‘विकासवारी’ हे पुस्तक म्हणजे उमेदवारीवरील दावा असल्याचे मानले जात आहे.

काय आहे ‘विकासवारी’
समीर यांच्या खासदारकीच्या पहिल्याच टर्ममधील विकासकामांची जंत्रीच ‘विकासवारी’त असणार आहे. यात देशातील तिसर्‍या मोठय़ा उड्डाणपुलाबरोबरच नाशिक- त्र्यंबकेश्वर हा 20 मिनिटांचा अंतर असलेला ‘ग्रीन रोड’, याबरोबरच गंगापूर धरणावरील वॉटर स्पोर्ट्स व अन्य कामांची माहितीही त्यात असेल. निवडणुकीतील आश्वासने, भाषणे व त्यांच्या पूर्ततेचा सचित्र वृत्तांतही पुस्तिकेत आहे.

शरद पवार यांचा आजचा दौरा असा
सकाळी 10.30 - नांदगाव : तहसील कार्यालय उद्घाटन, दुपारी 12.30 - दिंडोरी : मातेरेवाडी- कादवा कारखाना इमारतीचे उद्घाटन, दुपारी वाजता - नाशिक : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन, दुपारी 4.30 वाजता- राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन.