आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘समृद्धी’च्या क्षत्रिय दांपत्यास अटक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहर व जिल्ह्यातील शेकडो गुंतवणूकदारांना सुमारे शंभर कोटींपर्यंत गंडा घालणार्‍या समृद्धी वेल्थ मॅनेजमेंटच्या मुख्य संचालक अजय क्षत्रिय व त्याची पत्नी मनीषा क्षत्रिय यांना अटक करण्यात आली आहे. सलग दोन दिवस मुंबईत सापळा रचून त्यांना जेरबंद करण्यात भद्रकाली पोलिसांना यश आले आहे.

दरमहा पाच टक्के, त्रैमासिक सहा टक्के व वार्षिक गुंतवणूक केल्यास दरमहा आठ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून समृद्ध कंपनीच्या नावाने सुमारे दीडशे कोटींपर्यंतच्या ठेवी जमा करण्यात आल्या होत्या. सुरुवातीला नियमित चार-सहा महिने पैसे मिळू लागल्याने गुंतवणूकदारांची संख्या वाढत होती. मात्र, ग्राहकांच्या चार-सहा महिन्यांची मुदत पूर्ण झाल्यानंतर व्याजासह रक्कम देण्यास कंपनीकडून टाळाटाळ होऊ लागल्याने आणि क्षत्रिय यांच्या कार्यालयातील कर्मचारी पसार झाल्याने संशय वाढला होता.

गुंतवणूकदार अँड. विशाल विजन यांच्यासह शंभरहून अधिक तक्रारदारांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात धाव घेतली. 8 एप्रिल रोजी फसवणुकीचा आणि महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंध संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यात पोलिसांकडून अटक करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप गुंतवणूकदारांकडून केला जात होता. त्याचप्रमाणे पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांना वारंवार भेटून आरोपींच्या अटकेची मागणी केली जात होती. अखेर सरंगल यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकालीचे वरिष्ठ निरीक्षक धनराज दायमा, निरीक्षक नरेंद्र गायकवाड यांच्या पथकाने मुंबईत सापळा रचून संशयितांना जेरबंद केले.
असा रचला सापळा, असे टिपले सावज - पोलिसांनी क्षत्रिय यांच्या संपर्कात असलेल्या नातलग, मित्र, व्यावसायिकांची शोधमोहीम हाती घेतली होती. राज्यभरातील पोलिस यंत्रणेला त्यांचे छायाचित्र पाठविण्यात आले होते. वेगवेगळ्या फोनचे लोकेशन, संपर्कात येणार्‍यांची कसून चौकशी केली जात होती. त्यातच क्षत्रिय हा मुंबईतील प्रेमानंद स्वामी यांच्या नियमित संपर्कात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी स्वामीला शोधून त्याला ताब्यात घेतले. मुंबईतील दादर स्टेशननजीकच्या एका हॉटेलमध्ये दोन दिवस सापळा रचून स्वामी यास क्षत्रियला बोलविण्यास भाग पाडले. त्यानुसार क्षत्रिय बुधवारी दुपारी हॉटेलमध्ये येताच त्यास पकडण्यात आले. त्यापाठोपाठ त्याची पत्नी मनीषा हिचा शोध घेत सायंकाळपर्यंत पुण्यातून मनीषालाही अटक करण्यात आली.