आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायब तहसीलदाराला वाळू तस्‍करांची बेदम मारहाण; अंगावर ट्रॅक्‍टरही चढवला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर - नायब तसीलदार दत्तात्रेय जाधव आणि तलाठी पोमल तोरणे यांच्यावर हल्ला करून वाळूतस्करांनी त्यांना बेदम मारहाण केली. नंतर त्यांच्या अंगावर वाळूने भरलेला ट्रॅक्टर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. दोघेही या हल्ल्यातून बचावले असून, यासंदर्भात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तहसीलदार पोलिस उपअधीक्षकांनी घटनास्थळी भेट दिली. संगमनेरपासून १० कि.मी.वर चिखली गावात शनिवारी रात्री ११ वा. हा प्रकार घडला.

या दर्भाततलाठी तोरणे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात आयुब हसन शेख, लतीफ हसन शेख, त्यांची आई आणि हासे नावाच्या ट्रॅक्टरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. जाधव यांच्यासह महसूलचे पथक शनिवारी रात्री चिखली गावात गेले होते. नदीपात्रातून वाळू घेऊन येणारा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर त्यांना दिसला. त्यांनी विचारपूस केली असता हा प्रकार घडला. प्रसंगावधान राखून दोघेही बाजूला सरकल्याने बचावले. वाळूतस्करांनी या दोघांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. नायब तहसीलदार जाधव यांचा मोबाइल काढून घेतला. घटनास्थळाहून एक ब्रास वाळू भरलेला ट्रॅक्टर आरोपींनी पळवून नेला. शासकीय कामात अडथळा आणला अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण आणि त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तहसीलदार शरद घोरपडे आणि पोलिस उपअधीक्षक डॉ. अजय देवरे यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. यापूर्वी तलाठी तोरणे यांना वाळूतस्करांनी तहसील आणि पोलिस ठाण्याच्या आवारातच मारहाण केली होती. नायब तहसीलदार जाधव यांच्यावर पठार भागात हल्ला झाल्याची घटना ताजीच आहे. हे दोघे वाळूतस्करांच्या रडारवर असल्याचे दिसते.