आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sand Transport Carrier News In Marathi, Crime Logded Against Two Person

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाळू वाहतूकदाराची उपनिरीक्षकास दमदाटी, दोघांविरूध्‍द गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाकेबंदीदरम्यान वाळू वाहतूक करणार्‍या डंपरचालकास थांबण्याची सूचना करूनही त्याने न थांबता ट्रक पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी ट्रक अडविल्यानंतर चालकाने मुजोरपणा दाखवित पोलिस उपनिरीक्षकालाच धक्काबुक्की केल्याची घटना चोपडा लॉन्स परिसरात घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याने त्यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गोंधळ घालून ‘आम्ही आमदाराचे कार्यकर्ते असून, आमचे तुम्ही काहीच वाकडे करू शकणार नाही’, असेही धमकावले.


सरकारवाडा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार व चार कर्मचारी रविवारी दुपारी वाहनांची तपासणी करीत होते. त्याचवेळी वाळूने भरलेला डंपर (एमएच 15, सीके 9514) रामवाडीकडून चोपडा लॉन्सकडे येत होता. पवारांनी डंपर थांबविण्याची सूचना केली. मात्र, चालकाने डंपर पुढे नेल्याने पवार यांनी पाठलाग करून डंपर थांबविला. काही विचारण्यापूर्वीच चालक भीमराव सैंदाणे (रा. आडगाव) याने उपनिरीक्षकाला अरेरावी करीत कारवाईस मज्जाव केला व मोबाइलद्वारे मालकास ही बाब कळवली. काही वेळातच मालक साहेबराव थोरात (रा. विंचूरगवळी) हे दाखल झाले व त्यांनी उपनिरीक्षक पवार यांना आम्ही आमदाराची माणसे आहोत, असे सांगत जबरदस्तीने पुढे ट्रक नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पवारांनी त्यांना अडविताच त्यांना थोरात व सैंदाणे यांनी धक्काबुक्की केली. इतर कर्मचार्‍यांनी पोलिस ठाण्यात ही घटना कळविताच जीप बोलावून दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला.


दबावाचा प्रयत्न
या घटनेचे वृत्त समजताच शहरातील वाळू वाहतूकदारांनी पोलिस ठाण्यात धाव घेत यंत्रणेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. गेल्या महिन्यातही लेखानगर, पेठेनगर येथे वाळू वाहतूकदारांवर महसूल कर्मचार्‍यांनी कारवाई केल्यावर दमदाटीचा प्रकार घडला होता. याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार करूनही पोलिसांनी वेळीच दखल न घेतल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात होता. त्यामुळे रविवारची ही घटना पोलिसांच्या अंगलट आल्याने संबंधितांविरुद्ध कारवाई होईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.


अंगावर धावून आले
डंपरचालकाने मुजोरपणाने आमदाराचे सर्मथक असल्याचे सांगत दमदाटी केली. दोघेही अंगावर धावून आले व त्यांनी धक्काबुक्की केली. - रमेश पवार, उपनिरीक्षक, सरकारवाडा पोलिस ठाणे