आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिसांच्या नाकावर टिच्चून चंदनचोरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शनिवारी पहाटे वाजून ५६ मिनिटे ही वेळ... सातपूर एमआयडीसीतील एका कंपनीच्या गेटवरून आत उड्या मारून १० ते १२ चंदनचोर आवारात शिरतात... कंपनीच्या सुरक्षारक्षकाला शस्त्राने धमकावत केबिनमध्ये बसवून ठेवतात.. इलेक्ट्रिकल कटरने आवारातील चंदनाचा वृक्ष तोडतात.. त्याचे तुकडे करतात.. बाहेर उभ्या केलेल्या गाडीत ही लाकडे भरतात पसार होतात.
चंबळच्या खोऱ्यातील डाकू ज्याप्रमाणे गावात येऊन गावकऱ्यांसमोर दरोडा टाकणार असल्याचे आव्हान द्यायचे आणि सांगितलेल्या दिवशी दरोडाही टाकायचे, अगदी त्याच पद्धतीने नाशिकमध्ये पोलिसांच्या नाकावर टिच्चून एका कंपनीच्या आवारात अशीच आव्हान देऊन चोरी झाल्याने नाशिकच्या कायदा सुव्यवस्थेचे ज्या घटनांमुळे धिंडवडे निघत आहेत, त्यात आणखी एका घटनेची भर पडली आहे. सातपूर एमआयडीसीतील नाईस परिसरात एशिया ऑटोमोटिव्ह लिमिटेड कंपनीत चोरीचा हा गंभीर प्रकार घडला. दोन एकरवर ही कंपनी असून, कंपनीच्या आवारात चंदनाची झाडे आहेत. १५ मे रोजी सकाळी दोन जण कंपनीच्या गेटवर आले, त्यांनी वॉचमनला चंदनाची झाडे विकायची का, असा प्रश्न विचारला. वॉचमनने नाही उत्तर दिल्यावर आम्ही रात्री येऊन झाडे तोडून नेऊ, पाहात राहा, अशी धमकी त्यांनी दिली. याबाबत कंपनीच्या व्यवस्थापकांनी पोलिसांकडे लेखी तक्रार दिली चंदनाच्या झाडांभोवती जाड लोखंडी जाळ्या बसविल्या. त्यानंतर २३ मे रोजी पहाटे दहा-बारा चंदनचोर कंपनीत घुसले. हातातील शस्त्रांनी दोघांनी वॉचमनला धमकावले इतरांनी गेटच्या समोरच्या बाजूला असलेल्या चंदनाचे झाड कापले, त्यांच्याकडे इलेक्ट्रिकल कटर होते, भिंतीच्या बाहेरील बाजूला चंदन चोरांची गाडी उभी होती. झाड कापल्यानंतर त्याचे तुकडे करून त्यांनी गाडीत टाकले आणि निघून गेले. विशेष म्हणजे ३.३० वाजेपर्यंत हा सगळा प्रकार सुरू होता आणि तो सुरू असतानाच चोरट्यांच्या टोळीतील दोन जण कंपनीच्या संपूर्ण आवारात फिरून चंदनाची झाडे आणखी कुठे कुठे आहेत त्याची पाहणी करीत होते.
पोलिसांची अगतिकता
शनिवारी दुपारी पोलिसांना कंपनीने माहिती कळविल्यानंतर दोन कोन्स्टेबल आले, त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या घरासमोरून चंदनाची झाडे तोडून नेल्याचे उदाहरण देत कंपनी आवारात आहेत ती झाडे पालिकेची परवानगी घेऊन तोडण्याचा सल्ला दिला. दरम्यान, पोलिसांनी दुपारनंतर या प्रकरणी माहिती घेण्यास सुरुवात केली. मात्र, गुन्हेगारांपुढे नाशिक पोलिस किती दुबळे आहेत आणि पोलिसांचा दराराच उरला नसल्याचे हे बोलके उदाहरण पुन्हा एकदा समोर आले आहे.
पोलिसांनाच आव्हान...
औद्योगिक वसाहतीत दिवाळीच्या काळात नेहमी चोऱ्या होत असत. मात्र, ही परंपरा दोन वर्षांपासून खंडित झाली आहे. यामुळे पोलिसांचा सत्कारही निमा, आयमासारख्या औद्योगिक संघटनांनी केला आहे. मात्र, थेट धमकी दिल्याची माहिती पाेलिसांना देऊनही चाेरीचा हा गंभीर प्रकार घडला असून, पोलिसांनाच गुन्हेगारांनी हे आव्हान दिले आहे.
गेटवरून उड्या मारून प्रवेश
- रात्री तीनच्या सुमारास हे नऊ-दहा लोक कंपनीच्या गेटवरून उड्या मारून आत आले. एकाच्या हातात शस्त्र होते. त्याच्यासह दोघांनी मला कॅबिनमध्येच अडवून ठेवले. माझ्यासमोर ही चोरी होत होती. पण, जिवाच्या भीतीने मला काहीच करता आले नाही.
कोमल सिंग राजपूत, सुरक्षारक्षक
धमकीची तक्रार दिली होती
- १५ मे रोजी दोन लोकांनी झाडे तोडून नेण्याची धमकी दिली होती, त्यावर आम्ही पोलिसांत तक्रार केली होती. मात्र, तरीही ही घटना घडलीच. अजूनही येण्याची धमकी या लोकांनी दिलेली असल्याने आम्ही भयभीत आहोत.
अभय चंद्रात्रे, कंपनी व्यवस्थापक
बातम्या आणखी आहेत...