आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कालचे ‘संध्याछाया’ आज मात्र धूसर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एखाद्या परिवारातील एखादं मुलं नोकरीनिमित्त दुसर्‍या शहरात वा देशात असेल, तर त्याची काळजी आणि विशेष म्हणजे तो परतण्याची ओढ ही असतेच. हीच ओढ आणि त्याच्याकडून आई-वडिलांना असणार्‍या आशा-आकांक्षा अपूर्ण राहतात आणि त्या विखुरलेल्या कुटुंबाचे काय होते याचे चित्रण स्नेहबंधनिर्मित ‘संध्याछाया’ या नाटकातून उत्कृष्ट सादर झाले. पण, हा कालातीत विषय आज मात्र धूसर वाटत होता. कारण नाटकाचा फॉर्म दिग्दर्शकाने अगदी नेपथ्यापासून वेशभूषेपर्यंत तसाच ठेवल्याने ते नाटक केवळ अभिनयाने तारून नेले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

1970 मध्ये लेखक जयवंत दळवी यांनी लिहिलेले आणि 1976 मध्ये प्रथम रंगमंचावर आलेले ‘संध्याछाया’ हे नाटक त्या काळात गाजले होते. त्याचा विषयच त्या काळाला अनुसरून होता. एका दांपत्याचा एक मुलगा लष्करात, तर दुसरा मुलगा परदेशी नोकरीला असतो. परदेशातील मुलगा आई-वडिलांना न सांगता लग्न करतो, आठ-दहा वर्षे परत येत नाही. परततो पण केवळ भेटायला, तर दुसर्‍या मुलाचा मृत्यू होतो. अशी काहीशी या नाटकाची कथा. या नाटकाची कथा जुनीच असली, तरी त्यात नाना-नानीच्या भूमिकेत नाशिकचे ज्येष्ठ कलाकार सदानंद जोशी आणि हेमा जोशी होते. त्यामुळे नाटक भक्कम झाले होते. सिद्धार्थ बोडके, स्वरूप बागुल, कैवल्य जोशी, अजय तारगे, सई मोराणकर यांनीही आपापली कामे चांगली केली.

मुळातच नाटक लिहिलेला काळ आणि आजचा काळ यात फार मोठा फरक आहे. आज अनेक पालक आपल्या मुलाने खूप शिकावे, परदेशात जावे, यासाठी धडपडत असतात. त्याने केलेलं लग्नही आता बरेचदा स्वीकारलही जातं. पालकच आता आपल्या परदेशी असलेल्या मुलांकडे बरेचदा जाऊनही येतात. मुलं आणि त्यांची भेट ही जी पूर्वी तगमग असायची ती आता बरीच कमीही झालेली दिसते. त्यामुळे हे नाटक आणि आजची परिस्थिती यात पूर्णत: तफावत असल्याने नाटक फारशी पकड घेत नव्हते. ते तरले ते केवळ अभिनयाच्या जोरावर. नाटकातील घर हे अगदीच जुन्या काळात नेत होते. अगदी त्यात भिंतीवर असलेले मुलांचे फोटो ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट, जुनं घड्याळ यापासून ते नानी ट्रंक दाखवते तिथंपर्यंत. पण फोन मात्र आजच्या काळातला दिसतो. किंवा विनय भोळे हा करंदीकरांचा पत्ता विचारत नाना-नानीकडे येतो. नाना त्याला पेइंग गेस्ट म्हणून तू करंदीकरांकडे राहणार, तू किती भाडे देणार? तो 100 रुपये म्हणतो या संवादाला तर हसूच येते. (त्या काळात तो योग्यच होता.) अशा अनेक गोष्टीत थोडातरी बदल केला असता तरी चालले असते. नाटकाचे दिग्दर्शन सचिन शिंदे यांचे होते. प्रकाशयोजना विनोद राठोड, रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा नेहा जोशी, तर संगीत मकरंद हिंगणे यांचे होते.