आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅमे-याचे अस्तित्व विसरून अभिनय हवा - संदीप कुलकर्णी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - कॅमे-याचे अस्तित्व विसरून अभिनय कर तेव्हाच खरा सिनेअभिनेता होशील, ही महत्त्वाची टीप्स श्याम बेनेगल यांनी दिली होती. तीच मी पुढील पिढ्यांना देत असल्याचे सांगत सिनेअभिनेते संदीप कुलकर्णी यांनी आपला नाटक ते चित्रपट प्रवास रसिकांशी मनमोकळ्या गप्पा करत उपस्थितांच्या पुढ्यात मांडला.
श्री ज्योतीतर्फे डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित ग्रंथयात्रेत मुलाखतपर कार्यक्रमात ते बोलत होते. सत्यदेव दुबेंच्या मार्गदर्शनाखाली ते रंगभूमीवर कसे स्थिरावत गेले याची रंजक कथा त्यांनी रसिकांच्या पुढ्यात मांडली. जे.जे. स्कूल ऑफ आटर्समधून चित्रकलेचे शिक्षण घेतले. पण, ‘अंधयुग’ या हिंदी नाटकाच्या निमित्ताने सत्यदेव दुबेंच्या सहवासात आल्यावर अभिनय हेच पॅशन होत गेल्याचे ते म्हणाले. जे चित्रातून व्यक्त करत होतो ते चेह-यातून व्यक्त करीत असताना त्यांच्या अभिव्यक्तीला अनेक आयाम मिळाल्याचेही कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. बेनेगलांच्या चित्रपटात काम करायची संधी मिळाल्यानंतर चित्रपटक्षेत्रात आलो. ‘हजार चौरासी की मॉँ’सारखा गोविंद निहलानींचा चित्रपट करायला मिळाला. ‘ध्यानीमनी’ हे व्यावसायिक नाटकदेखील केले. दूरदर्शनवर ‘नटसम्राट’ करायची संधी मिळाली. या सगळ्यातून शिकत-स्थिरावत असतानाच ‘श्वास’ या चित्रपटाने लोकप्रियतेच्या उंबरठ्यावर नेऊन पोहचवल्याचे सांगतानाच त्यांच्या चेह-यावरील आनंद ओसंडून वहात होता.
या चित्रपटातील सर्जनच्या भूमिकेसाठी खरीखुरी ऑपरेशन्सदेखील अभ्यासल्याची माहिती त्यांनी दिली. ‘डोंबिवली फास्ट’, लॉस एंजेलिसच्या फेस्टिव्हलमध्ये परिणितासारख्या मातब्बर चित्रपटांच्या स्पर्धेत उतरत बेस्ट फिल्म म्हणून पात्र ठरल्याचे सांगतानाच गुंतता हृदय हे या सिरियलमधून महिलांचा चाहता वर्गदेखील वाढला नाकारता येणार नसल्याचे ते म्हणाले. चित्रपट, नाटक, सिरियल अशा तिन्ही माध्यमांतून काम करताना चित्रपट हेच पॅशन असल्याचे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. मंदार जोशी यांनी त्यांची मुलाखत घेतली.
प्रतीक्षा ‘अजिंक्य’ची - मार्च-एप्रिलमध्ये संदीप कुलकर्णीची प्रशिक्षकाची भूमिका असलेला ‘अजिंक्य’ हा बास्केटबॉलवर आधारित चित्रपट येत आहे. खेळ हा खेळ राहिलेला नसून रिफ्रेशमेंटऐवजी तणाव देणारा बनत चालला आहे, अशा आशयाचा हा चित्रपट आहे.