आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक महापालिका आयुक्त संजय खंदारे प्रभारी विभागीय आयुक्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड- नाशिक विभागाचे मिनी मंत्रालय म्हटले जाणार्‍या विभागीय महसूल आयुक्तालयाची महत्त्वाची पदे रिक्त असल्याने कामकाजावर परिणाम जाणवत आहे. दरम्यान, विभागीय आयुक्तपदाचा अतिरिक्त भार महापालिका आयुक्त संजय खंदारे यांच्याकडे शासनाने सोपवला आहे.
उपायुक्तांकडून एकूण कार्यालयाचा कार्यभार सांभाळला जात असून, विभागाचाही पदभार त्यांना सांभाळावा लागत आहे. त्यामुळे या विभागातील पाच जिल्ह्यांतील अनेक प्रकरणे निर्णयाविना प्रलंबित आहेत. विभागीय आयुक्तालयातील विभागीय आयुक्त, अपर आयुक्त व प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी ही तिन्ही महत्त्वाची पदे रिक्त असून, त्यांचा अतिरिक्त पदभार इतरांकडे आहे. या आयुक्तालयातून नाशिक, जळगाव, अहमदनगर, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांचे कामकाज चालते. विभागीय आयुक्त रवींद्र जाधव शनिवारी (दि. 30 नोव्हेंबर) सेवानिवृत्त झाले. अधिकारी निवृत्तीपूर्वी नवीन नियुक्तीची परंपरा यंदा खंडित झाली. रविवारी सायंकाळपर्यंत नवीन नियुक्ती न झाल्याने अखेर सायंकाळी शासनाकडून पालिका आयुक्त संजय खंदारे यांच्याकडे विभागीय आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेवर कामाचा ताण असल्याने हा पदभार सांभाळताना त्यांच्यावर ताण पडणार आहे.
उपायुक्तच अपर आयुक्त : विभागीय आयुक्तांनंतर अपर आयुक्त हे दुसरे महत्त्वाचे पद असून, या पदावर गेल्या सात महिन्यांपासून स्वतंत्र अधिकारी नियुक्त नाही. तत्कालीन अपर आयुक्त टी. के. बागुल मे महिन्यात निवृत्त झाले. त्यांच्या जागी नेमणूक झालेली नाही. पुरवठा उपायुक्त रावसाहेब बागडे अपर आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत. सात महिन्यांपासून शेतीविषयक हजारो प्रकरणे सुनावणीविना पडून आहेत.
अधिकार्‍याशिवाय चौकशी विभाग
आयुक्तालयात चौकशी अधिकारीच नसून, तिसरे महत्त्वाचे प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारीपद सहा महिन्यांपासून रिक्त आहे. पुरवठा उपायुक्त रावसाहेब बागडे यांनी काही महिने हे पद सांभाळले. त्यानंतर दीड महिन्यापूर्वी रुजू झालेले करमणूक विभागाचे उपायुक्त ए. एम. ओझरकर यांच्याकडे प्रादेशिक चौकशी अधिकारीपदाची जबाबदारी आली.