आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वरांचा वर्षाव, हास्याचा खळखळाट, गाेविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाचा याेगायाेग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शब्दा-शब्दालाहाेणारा हास्याचा खळखळाट, टाळ्यांची दाद अाणि अाैचित्यानुसार रंगलेले नाट्य संगीत, त्याच्या ताना, अालाप अाणि अाराेह-अवराेहांना मिळालेली दिलखुलास पसंती... अभिनयाची निपुणता, साजेसा रंगमंच अाणि टाळ्यांचा कडकडाट... हा संगीत साेहळा रसिकांनी अनुभवला ‘संगीत संशयकल्लाेळ’ या नाटकाच्या देखण्या प्रयाेगातून.. शंभर वर्षांपूर्वीच्या तरुण नाटकाला मनाच्या तसबिरीत कायमचे मढवत...
‘दिव्य मराठी’च्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त शांतुषा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या सहयाेगाने प्रशांत दामले फॅन फाउंडेशन निर्मित या नाटकाचा नाशिककर रसिकांनी उत्सवाच्या पहिल्याच पुष्पात अानंददायी अास्वाद घेतला. गाेविंद बल्लाळ देवल लिखित या विनाेदी नाटकाचा पहिला प्रयाेग २० ऑक्टोबर १९१६ रोजी गंधर्व नाटक मंडळीने केला हाेता. मात्र, अाजही बघताना हे नाटक अत्यंत तरुण असल्याचे अभिनेते प्रशांत दामले अाणि गायक अभिनेते राहुल देशपांडे यांनी दाखवून दिले, सिद्धच केले. किंबहुना, निपुण धर्माधिकारी या दिग्दर्शकाने त्याची नव्याने केलेली मांडणी नाटकाला अधिक उच्चतम पातळीवर घेऊन गेली.

गाेष्ट तशी साधीच. बायकाेचा नवऱ्यावर संशय अाणि नवऱ्याचा बायकाेवर संशय; पण बल्लाळांनी ते लिहिलंही अतिशय उच्च पातळीचे अाणि कलाकारांनी अापल्या अभिनयाने त्या नाटकाला कळसच बसविला. त्यामुळे ८० वर्षांचे अाजी-अजाेबा असाे, वा सात वर्षांचा चिमुरडा, दामलेंच्या अभिनयावर खळखळून हसतानाच राहुल देशपांडेंच्या नाट्यपदांचाही अास्वाद घेत हाेता. रंगमंचावर कधी नाट्यपदे, तर कधी दामलेंचा अभिनय अशी छुपी जुगलबंदीच जणू रंगली हाेती. पण, जेव्हा हे दाेघेही एकत्र येत तेव्हा जी काही धमाल उडाली ती रसिकांनी अक्षरश: डाेक्यावर घेतली. संशयात अाता नक्की काय हाेणार, हा प्रत्येकाच्या मनात असलेला संशय हळूहळू उलगडतानाच मध्येच कधी हास्याची लकेर उमटायची, तर नाट्यपदांची अवीट गाेडी बरंच काही सांगून जात हाेती.

मूळ नाटकात ३० गाणी होती अाणि ताज्या नाटकातही तब्बल १८ गाणी रसिकांना एेकायला मिळतात अाणि एक स्वर्गीय मैफलीत बसल्याचा अानंद देतात. या नाटकात प्रशांत दामले (फाल्गुनराव), राहुल देशपांडे (अश्विनशेठ), उमा पळसुले-देसाई (रेवती), दीप्ती माटे (कृत्तिका), चिन्मय पाटसकर (साधू आणि वैशाख), नचिकेत जोग (भादव्या), नीता पेंडसे( रोहिणी आणि मघा) यांच्या भूमिका आहेत.

प्रारंभी ‘दिव्य मराठी’चे सीअाेअाे निशित जैन, शांतुषा डेव्हलपर्स अंॅड बिल्डर्सचे संचालक शांतारामबापू सावळे, स्नेहल राहुल सावळे, ‘दिव्य मराठी’चे जनरल मॅनेजर मदनसिंह परदेशी अाणि निवासी संपादक जयप्रकाश पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उत्सवाचा प्रारंभ करण्यात अाला. यावेळी शांताराम सावळे यांचा निशित जैन यांच्या हस्ते सत्कार करण्यात अाला. ‘दिव्य मराठी’चे डेप्युटी एडिटर अभिजित कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.

सहकलाकारांचेही काैतुक
प्रशांत दामले राहुल देशपांडे यांच्यासह नाटकातील इतर सहकलाकारांचा अभिनयही ताेडीस ताेड असाच हाेता. मग ताे भादव्याचे काम करणारा नचिकेत जाेग असाे, राेहिणी किंवा मघाचं काम करणारी नीता पेंडसे, फाल्गुनरावांच्या बायकाेचे कृत्तिकेचे काम करणारी दीप्ती माटे, वा साधू अाणि वैशाखच्या भूमिकेतील चिन्मय पाटसकर, सर्वांनीच नाटकात जान अाणली. त्यांच्याही अभिनयावर उपस्थितांनी टाळ्यांच्या माध्यमातून काैतुक वर्षाव केला.

संगीत संशयकल्लाेळचे लेखक गाेविंद बल्लाळ देवल यांचे १४ जून १९१६ राेजी मिरज येथे निधन झाले. बल्लाळ यांच्या शंभराव्या स्मृतिदिनानिमत्त या नाटकाचा याेग जुळून अाला. संशयकल्लाेळचा पहिला गद्य प्रयोग सन १८९४ मध्ये ‘तसबिरीचा घोटाळा ऊर्फ फाल्गुनरावांचा फार्स’ या नावाने झाला. १९१६ पर्यंत या नाटकाचे प्रयोग होत होते. गंधर्व नाटक कंपनीने मूळ नाट्यसंहितेत बदल करून नाटकात पदे घातली. बहुतेक गाणी देवलांनी रचली होती. देवल हे अण्णासाहेब किर्लोस्कराचे शिष्य होते आणि एक उत्कृष्ट तालीममास्तर, कवी आणि संगीताचे जाणकारही होते.

राहुलच्या सुरांना दाद
राहुलदेशपांडे यांच्या प्रत्येक नाट्यपदाला दाद मिळाली. राहुल अाणि उमा पळसुले-देसाई यांनी १८ नाट्यपदे सादर केली. हृदयी धरा हा बाेध, सुखांत चंद्रानना, साम्य तिळही नच, कर हा करीं धरिला, धन्य अानंद दिन पूर्ण मम‌्, मजवरी तयाचे प्रेम घरे, स्वकर शपथ वचनी, मृगनयना रसिक माेहिनी अाणि चिन्मया सकल हृदया या नाट्यपदांचा समावेश हाेता. टिपेला जाणारा अावाज, अालापी अाणि जे सांगायचे अाहे ते गाण्यातून, अभिनयातून हे दिव्य राहुल अाणि उमा यांनी लीलया मांडले. खरं तर राहुल देशपांडे हे शास्त्रीय गायक. रसिकांना त्यांच्याकडून गाणं अपेक्षित पण त्यांच्यातील अभिनयाचा जाे काही पैलू त्यांनी रसिकांपुढे उलगडला त्याला ताेड नव्हती.

दामलेंच्या अभिनयाला सलाम
नाटक झाल्यावर प्रत्येक रसिक नाटक असावं तर असं अाणि अभिनय असावा तर असा, अशा भावनेने बाहेर पडत हाेता अाणि दामलेंच्या अभिनयाला सलाम करत हाेता. मुळातच विनाेदी स्वभाव, वेळेवर सुचणारे सुंदर अॅाडिशन्स, सहकलाकारांना दिलेली साद अाणि घेतलेला प्रतिसाद, त्यांनी शांत राहावं तरी रसिकांमध्ये हास्याची लकेर उमटते एवढे त्या माैनाचे सामर्थ्य अाणि नाटक नव्हे, हे प्रत्यक्षातच घडतं अाहे अशी अनुभूती देणारा अभिनय. नाशिककर रसिकांनीही त्यांच्या अभिनयाला टाळ्यांच्या कडकडाटात सलाम केला.