आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कित्येकांचे जन्मस्थळ, झाले अडगळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिककरांसाठी पाटील गल्ली येथील गाडगे महाराज चौकाच्या जागेत 1959 मध्ये ‘संत गाडगे महाराज प्रसूतिगृह’ तत्कालीन नगरपालिकेने बांधले. सूत्रांच्या माहितीप्रमाणे 2000 पर्यंत या प्रसूतिगृहाचे कामकाज सुरू होते; मात्र त्यानंतर देखभाल न झाल्यामुळे त्याला अवकळा आली, तर जीर्ण बांधकामाला तडे जाऊ लागले. परिणामी इमारत धोकेदायक बनूनही लाखो रुपयांची या प्रसूतिगृहातील महत्त्वाची यंत्रसामग्री पालिकेने हलवली नाही. चोरट्यांनी यंत्रसामग्रीसह छताचा पंखा, अगदी पीओपीचे आवरणही चोरून नेले.

जुन्या रेकॉर्डसाठी दुमजली इमारत
संत गाडगे महाराज प्रसूतिगृह बंद पडल्यावर काही काळ महापालिकेने जुने रेकॉर्ड ठेवण्यासाठी या दुमजली इमारतीचा वापर केला. मात्र, संपूर्णपणे खराब झालेल्या या इमारतीमुळे महत्त्वाचे जुने रेकॉर्डही नष्ट होण्याची भीती निर्माण झाल्याने इमारत खाली करण्यात आली. त्याचा फायदा जुगारी आणि मद्यपींनी घेतला.

ना डॉक्टर, ना नूतनीकरण
25 खाटांच्या रुग्णालयात एक ओपीडी, किरकोळ आजारांसाठी एक कक्ष, प्रसूतिगृहासाठी लागणार्‍या सर्वच सुविधा येथे पूर्वी होत्या. तत्कालीन नगरसेवक गजानन शेलार, विनायक खैरे आणि वत्सला खैरे यांनी या रुग्णालयाच्या नूतनीकरणासाठी प्रस्ताव दिला होता. त्यांच्या स्थानिक निधीतूनदेखील यातील काही कामे केली, मात्र काही वर्षांतच डॉक्टर नसल्याच्या कारणामुळे रुग्णालय बंद करण्यात आले. 2002-03 मध्ये येथील सर्व यंत्रे चोरट्यांनी पळवून नेली. स्थानिक नगरसेवकांनी आणि संत गाडगे महाराज मठ ट्रस्टच्या वतीने वारंवार करण्यात आलेल्या रुग्णालय दुरुस्तीच्या मागणीकडे तत्कालीन वैद्यकीय अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केले.

शाळेचे स्वास्थ्यही धोक्यात
अडगळीच्या इमारतीचा वापर सध्या सफाई कर्मचार्‍यांच्या हजेरीसाठी होत असला, तरी नियमित येणारे कर्मचारीही इमारतीची सफाई करीत नाहीत. इमारतीच्या शेजारीदेखील सकाळी शाळा भरते. पण, इमारतीच्या इतर खोल्यांमधून येणार्‍या दुर्गंधीमुळे विद्यार्थी हैराण आहेत. त्यामुळे येथील विद्यार्थीसंख्याही कमी होऊ लागली आहे.

ना तपास, ना चोरीची तक्रार
गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या प्रसूतिगृहाच्या दुरवस्थेबाबत पालिका अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता, त्यांनादेखील काहीच माहिती नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. चोरी झालेल्या यंत्रांची कोणत्याही प्रकारची लेखी तक्रार पालिकेने पोलिस ठाण्यात दिलेली नाही.

नूतनीकरणासाठी प्रयत्न सुरू
या प्रसूतिगृहाची दुरवस्था झाली आहे. त्याच्या नूतनीकरणाचा प्रस्तावदेखील दिला आहे. दुरुस्ती झाल्यास हे रुग्णालय आगामी सिंहस्थाच्या काळात फायदेशीर ठरणार आहे. विनायक खैरे, नगरसेवक

चोरांनी हात साफ केला
गेल्या काही वर्षांपासून हे रुग्णालय बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यातील यंत्रांवर काही भुरट्या चोरांनी हात साफ केला. राजू काळे, रहिवासी, गाडगे महाराज मठ

अधिकार्‍यांकडून दुर्लक्षच
गाडगे महाराज रुग्णालयासाठी गेल्या तीन ते चार वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे; मात्र वैद्यकीय व बांधकाम अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. पालिकेने लाखो रुपये खर्च करून बांधलेले हे रुग्णालय सध्या जुगार्‍यांचा अड्डा, अनैतिक धंदे, मद्यपींचा अड्डा बनले आहे. - वत्सला खैरे, नगरसेविका

जुगार, मद्यपींचा अड्डा
गाडगे महाराज धर्मशाळेची जागा 1959 मध्ये ट्रस्टने नगरपालिकेला प्रसूतिगृहासाठीच दिली होती. आता हे रुग्णालय मद्यपींचा अड्डा झाले आहे. त्याची दुरुस्ती करून पुन्हा रुग्णालय व्हावे. कुणाल देशमुख, ट्रस्टी, गाडगे महाराज धर्मशाळा