आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sarajai Charitable Trust,latest News In Divya Marathi

2500 तरुणांची झाली नोंदणीर; 400 वर तरुणांची प्राथमिक फेरीत झाली निवड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुने नाशिक- उच्च शिक्षण घेऊनही तरुणांना बेरोजगारीचा सामना करावा लागत असल्याने त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने सारजाई चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित दोनदिवसीय जॉब फेअरला शनिवारी (दि. 16) उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सिटी सेंटर मॉलजवळील ठक्कर डोम येथे सुरू झालेल्या जॉब फेअरच्या पहिल्याच दिवशी तब्बल 2500 तरुणांनी नोंदणी केली. त्यापैकी 400 हून अधिक जणांची विविध कंपन्यांकरिता प्राथमिक फेरीत निवड झाली आहे. यानंतर त्यांच्या पुन्हा मुलाखती घेण्यात येणार आहेत. या फेअरमध्ये सुमारे 40 नामवंत कंपन्यांनी सहभाग घेतलेला आहे.जॉब फेअरचे उद्घाटन शनिवारी शिवसेनेचे संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांच्या हस्ते झाले. या वेळी मिर्लेकर यांनी तरुणांना मार्गदर्शन करताना, नोकरी मिळविण्यासाठी आपण मुलाखतीला कशाप्रकारे सामोेरे जातो यावरच यश अवंलबून असते. त्यासाठी तरुणांनी आत्मविश्वासाने मुलाखतीला सामोरे गेले पाहिले. त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात यश मिळविणे सहज शक्य आहे, असे स्पष्ट केले.
सारजाई चॅरिटेबल ट्रस्ट, एम अ‍ॅण्ड एचआर सर्व्हिसेस व प्रज्ञा अ‍ॅड एजन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने दोनदिवसीय जॉब फेअर 2014 चे आयोजन नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांच्यातर्फेे करण्यात आले आहे. या वेळी प्रास्ताविकात नगरसेवक सूर्यवंशी म्हणाले की, तरुणांना करिअरबाबत वेळीच योग्य मार्गदर्शन मिळाले, तर ते आयुष्यात नक्कीच यशस्वी होऊ शकतील. त्यामुळे त्यांना योग्य दिशा दाखविण्याची गरज आहे. शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते म्हणाले की, सुरुवातीपासूनच शिवसेनेचा उद्देश हा फक्त राजकारण नसून समाजकारण हाच आहे. शहराचा विचार केला असता मंत्रभूमीकडून यंत्रभूमीकडे जाताना किती रोजगार निर्माण झाला, याचा विचार करणे गरजेचे आहे. जिल्हाप्रमुख विजय करंजकर म्हणाले की, युवकांनी आपल्याला काय करायचे आहे हे सर्वात आधी निश्चित केले पाहिजे. मनाची चलबिचल असल्यास आपण ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. अमेरिकेतील वैज्ञानिकांपैकी 48 टक्के भारतीय असून, त्यात 14 टक्के महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान आपण बाळगला पाहिजे. व्यासपीठावर माजी महापौर विनायक पांडे, दत्ता गायकवाड, महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, बळीराम ठाकरे, विलास शिंदे, उत्तम दोंदे, कल्पना पांडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

..या प्रमुख कंपन्यांचा आहे सहभाग
जॉब फेअरमध्ये एचडीएफसी बँक, अमेठी विद्यापीठ, शिपिंग एजन्सीज्, डेटा मॅटिक्स, सारडा समूह, रुंग्टा समूह, श्रीराम लाइफ इन्शुरन्स, रिलायन्स जनरल इन्शुरन्स, डब्ल्यूएनएस यांसह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सुमारे 40 नामवंत कंपन्यांनी सहभाग नोंदविलेला आहे.
रोजगारासाठी आज अखेरची संधी

जॉब फेअरला शनिवारी पहिल्याच दिवशी शहर व परिसरातील तरुणांचा मोठा प्रतिसाद लाभला. रविवारी (दि. 17) जॉब फेअरचा अखेरचा दिवस असून, सकाळी 10 ते 6 यादरम्यान तरुणांना विविध क्षेत्रांतील रोजगार मिळविण्याची संधी उपलब्ध राहणार आहे. जॉब फेअरचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.